Asia Cup Final : आशिया चषक 2022 च्या सुपर 4 सामन्यात पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारताला पुढील दोन्ही सामन्यात विजय मिळवणं अनिवार्य आहे. अन्यथा भारताला आशिया चषक स्पर्धेतून बाहेर पडावं लागणार आहे. फायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी आज भारताला श्रीलंकेविरोधात विजय मिळवावाच लागणार आहे.  श्रीलंकेविरोधात विजय मिळवल्यानंतरही आशिया चषकाच्या फायनलमधील भारताचे स्थान पक्कं नाही. काय आहेत, समिकरणं पाहूयात..


भारत फायनलमध्ये कसा पोहचणार? 
सुपर-4 स्टेजमध्ये प्रत्येक संघाला तीन-तीन सामने खेळायचे आहेत. भारतीय संघाचा सध्या एक सामना झालाय. ज्यामध्ये पाकिस्तानकडून पाच विकेटनं पराभव स्वीकारावा लागला. आज भारताचा दुसरा सामना होत आहे. स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी टीम इंडिया आज श्रीलंकाविरोधात दोन हात करणार आहे. 8 सप्टेंबर रोजी अफगाणिस्तानविरोधात सामना होणार आहे. आशिया चषकाच्या गुणतालिकेत भारत सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे.  भारताला फायनलमध्ये पोहचण्यासाठी उर्वरित दोन्ही सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. फक्त विजयच नव्हे तर भारताला चांगल्या नेटरनरेटने सामने जिंकावे लागणार आहे. भारतीय संघाने दोन सामने जिंकल्यास चार गुण होतील. नेटरनरेट चांगला असल्यास कोणत्याही अडचणीशिवाय भारतीय संघ फायनलला पोहचेल. 


फायनलमधून पत्ता कट होणार का?
 
- श्रींलका आणि अफगाणिस्तानचा पराभव केल्यास भारताचे चार गुण होतील.. अशात फायनलमध्ये पोहचण्याचे चान्सेस वाढतील. 
 
- श्रीलंकेनं जर पाकिस्तानचा पराभव केला तर फायनलसाठी नेटरनरेटचा विचार केला जाईल. 
 
-  श्रीलंकेचा नेट-रनरेट सध्या सर्वात चांगलाय


 - अफगाणिस्तान-श्रीलंका यांचा पराभव करण्यासोबतच  भारताला नेट-रनरेटही वाढवावा लागेल. 


- पाकिस्तान संघाचे अद्याप दोन सामने बाकी आहेत. श्रीलंका आणि अफगाणिस्तानविरोधात दोन्ही सामने होणार आहेत. जर दोन्ही सामने पाकिस्तान जिंकला तर फायनलमध्ये प्रवेश करेल.  


- आजच्या सामन्यात श्रीलंकेचा विजय झाल्यास भारतीय संघाचं फायनलमधील आव्हान संपुष्टात येईल. 


भारत-श्रीलंकेचा अलिकडचा फॉर्म
दोन्ही संघांचा अलीकडचा फॉर्म पाहता भारतीय संघाच पारडं जड दिसतंय. भारतानं यावर्षी 24 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यापैकी 18 सामने जिंकले आहेत. तर, 5 सामने गमावले आहेत. एक सामना निर्णित ठरला. दुसरीकडं श्रीलंकेच्या संघानं यावर्षी 14 टी-20 सामने खेळले आहेत. यापैकी श्रीलंकेला चार सामने जिंकता आले. तर, 9 सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता. यातील एक सामना अनिर्णित राहिलाय.


पाकिस्तान, श्रीलंका गुणतालिकेत अव्वल
आशिया चषकाच्या गट सामन्यात दमदार प्रदर्शन करत भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि अफगाणिस्तान या चार संघांनी आशिया कपच्या सुपर-4 फेरीत प्रवेश केला. ज्यात श्रीलंका आणि पाकिस्ताननं आपपल्या पहिल्या सामन्यात विजय मिळवला आहे. तर, भारत आणि अफगाणिस्तानच्या संघाला त्यांच्या पहिल्या सामन्यात पराभवाला सामोरे जावा लागलं. पाकिस्तान आणि श्रीलंका गुणतालिकेत पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. तर, भारत आणि अफगाणिस्तानचा संघ तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहे. आशिया चषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी एका संघाला तीन पैकी दोन सामने जिंकणं अनिवार्य आहे. 


आशिया चषकात कोणता संघ सर्वाधिक वेळा चॅम्पियन?



आशिया चषक पहिल्यांदा 1984 मध्ये आयोजित करण्यात आला होता. भारतानं सर्वाधिक सात वेळा आशिया चषकाचा खिताब जिंकलाय. तर, दुसरा यशस्वी संघ श्रीलंका आहे. जे पाच वेळा चॅम्पियन ठरले आहेत. पाकिस्ताननं दोन वेळा आशिया चषक स्पर्धा जिंकली आहे. भारत एकमेव संघ आहे, ज्याने आशिया चषकाच्या दोन्ही फॉरमॅटमध्ये खिताब जिंकलाय.