Sachin Tendulkar on Arshdeep Singh : आशिया चषकातील सुपर 4 लढतीत भारताला पाकिस्तानकडून (IND vs PAK) पराभव पत्करावा लागला. या सामन्यात टीम इंडियाकडून अनेक चूका झाल्या. मोक्याच्या क्षणी अर्शदीप सिंहकडून (Arshdeep Singh) आसिफ अलीचा अगदी सोपा झेल सुटला होता. त्यामुळे अर्शदीपल सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल करण्यात आले. पाकिस्तानमधूनही अर्शदीपवर टीकास्त्र सोडण्यात आलं. अर्शदीपवर अनेकांनी वयक्तिक टीका केली. अर्शदीपच्या सपोर्टसाठी अनेक आजी-माजी क्रिकेटपटू पुढे आले आहेत. विराट कोहलीनं पत्रकार परिषदेत अर्शदीपला पाठिंबा दर्शवला होता. आता यामध्ये क्रिकेटचा देव अर्थात सचिन तेंडुलकर यानेही उडी घेतली आहे.
माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनं अर्शदीपच्या सपोर्टमध्ये ट्वीट केले आहे. सचिन तेंडुलकरनं अर्शदीपला यामध्ये मोलाचा सल्ला दिलाय. ट्रोलर्सला मैदानातील खेळातून उत्तर दे, असा सल्ला सचिन तेंडुलकरनं अर्शदीपला दिलाय.
सचिन तेंडुलकरनं आपल्या ट्वीटमध्ये काय म्हटलं?
प्रत्येक खेळाडू आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करताना आपलं सर्वस्व पणाला लावतो, त्याशिवाय आपलं सर्वोत्कृष्ट देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यांना आपल्या पाठिंब्याची नेहमीच गरज असते. खेळात तुम्ही कधी जिंकता तर कधी पराभव होतो. क्रिकेट असो अथवा इतर खेळ... कोणत्याही खेळाडूवर वैयक्तिक टीका करणं चुकीचं आहे. अर्शदीप तू घाबरु नकोस... प्रयत्न करत राहा. ट्रोलर्सला मैदानातील खेळातून उत्तर दे.. आम्ही तुझ्या पाठिशी आहोत... पुढील सामन्यासाठी तुला शुभेच्छा!
विराट कोहलीचा अर्शदीपला पाठिंबा
भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीनं अर्शदीप सिंहला पाठिंबा दिला आहे. विराटने पत्रकार परिषदेत म्हटलं की, 'चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जेव्हा मी पाकिस्तानविरुद्ध माझा पहिला सामना खेळत होतो, तेव्हा मीही खराब शॉट खेळून आऊट झालो होतो. दबावाखाली कोणीही चूक करू शकतो. संघातील वातावरण सध्या चांगलंच आहे. अर्शदीपला त्याची चूक समजून घ्यावी लागेल जेणेकरुन तो पुढच्या वेळी दबावाच्या परिस्थितीत चांगली कामगिरी करू शकेल.'
सोशल मीडियावर मीम्स व्हायरल
महत्त्वाची कॅच सोडल्यानं अर्शदीप सिंह (Arshdeep Singh) सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहे. भारताच्या पराभवानंतर नेटकरी अर्शदीप सिंहवर संतापलेले पाहायला मिळत आहेत. नेटकरी सोशल मीडियावर अर्शदीपला ट्रोल करत आहे. या संदर्भातील अनेक मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. ट्विटवर #ArshdeepSingh ट्रेंडींगमध्ये आहे. तर याच्या उलट काही चाहते अर्शदीपच्या समर्थनार्थ उतरले आहेत. त्यांनी अर्शदीपला पाठिंबा दिला आहे.