Asia Cup 2023 Date : आशिया चषक 2023 च्या तारखा आणि ठिकाणांची घोषणा अखेर झाली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतर्गत कलहामुळे आशिया चषकाच्या तारखा आणि घोषणा रखडली होती.  अखेर आज आशियन क्रिकेट काऊन्सिलने आशिया चषकाची घोषणा केली आहे. 


31 ऑगस्ट 2023 ते 17 सप्टेंबर 2023 यादरम्यान आशिया चषक रंगणार आहे.  भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्थान आणि नेपाळ या देशांमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. 13 एकदिवसीय सामन्यानंतर आशियाचा किंग कोण ? यावरुन पडदा उठणार आहे. 


आशिया चषकासाठी हायब्रिड मॉडेल वापरण्यात आलेय. पाकिस्तानमध्ये चार सामने होणार आहेत. तर उर्वरित सर्व सामने श्रीलंकामध्ये खेळवण्यात येणार आहेत. हायब्रिड मॉडेलचा स्विकार केल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये जाणार नाही? हे आता जवळपास स्पष्ट झालेय. टीम इंडियाचे सर्व सामने श्रीलंकामध्ये खेळवण्यात येणार आहेत. लवकर आशिया चषकाच्या वेळापत्रकाची घोषणा होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील थरारक सामना श्रीलंकामध्ये होण्याची शक्यता आहे. 


आशिया चषकाचा 2023 चा हंगाम दोन ग्रुपमध्ये खेळवण्यात येणार आहे. दोन ग्रुपमधील आघाडीचे प्रत्येकी दोन संघ सुपर फोरसाठी पात्र होतील. चारमधील आघाडीचे दोन संघ फायनलला पोहचतील. 
 






15 वर्षानंतर पाकिस्तानमध्ये आशिया चषक - 


तब्बल 15 वर्षानंतर आशिया चषक पाकिस्तानमध्ये होत आहे. 2009 मध्ये श्रीलंका संघावर पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. तेव्हापासून पाकिस्तानमध्ये अनेक संघांनी क्रिकेट खेळण्यास नकार दिला होता. मागील दोन ते तीन वर्षानंतर परिस्थितीत पूर्वपदावर येत आहे. न्यूझीलंड आणि इंग्लंडसारखे संघ पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. भारतामधील दहशतवादी हल्ल्यानंतर टीम इंडियाने पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्यास नकार दिलाय. दशकभरापासून भारतीय संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेलेला नाही. आशिया चषकाचे संपूर्ण आयोजन पाकिस्तानमध्ये व्हावे, यासाठी पीसीबी अडून बसले होते. पण भारताने पाकिस्तानमध्ये जाण्यास स्पष्ट नकार दिला.. त्यानंतर आता हायब्रेड मॉडेल तयार करण्यात आलेय. त्यानुसार आता पाकिस्तानमध्ये चार तर श्रीलंकामध्ये 9 सामने खेळवले जाणार आहेत. 






बुमराह, श्रेयस पुनरागमन करणार ?
विश्वचषकाआधी आशिया चषक संघ बांधणीसाठी चांगली संधी आहे, टीम इंडियाही त्याचपद्धतीने आपली तयारी करेल. आशिया चषकामध्ये केएल राहुल, जसप्रीत बुमराह आणि श्रेयस अय्यर टीम इंडियामध्ये पुनरागमन करतील, असा अंदाज वर्तवला जातोय. या खेळाडूंच्या पुनरागमनामुळे निवड समितीच्या अडचणी आणखी वाढू शकतात.