Asia Cup 2022, IND vs SL:  पाथुम निसांका आणि कुसल मेडिंस यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर श्रीलंकेनं भारताचा सहा गड्यांनी पराभव केला. भारतानं दिलेलं 174 धावांच आव्हान श्रीलंकेनं चार गड्यांच्या मोबदल्यात एक चेंडू राखून पार केलं. आशिया चषकातील सुपर 4 लढतीमध्ये भारताचा हा सलग दुसरा पराभव आहे. या पराभवासह भारतीय संघाचं स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे.  


श्रीलंकेच्या सलामी फलंदाजांची दमदार खेळी - 
भारताने दिलेल्या 174 धवाांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या सलामी फंलदाजांनी दमदार सुरुवात केली. पाथुम निसांका आणि कुसल मेंडिस यांनी दमदार अर्धशतकी खेळी केली. पाथुम निसांकानं 37 चेंडूत 52 धावांची खेळी केली. पाथुम निसांका आणि कुसल मेंडिस यांनी पहिल्या विकेटसाठी 97 धावांची भागिदारी केली. श्रीलंकेच्या सलामी फलंदाजांनी भारताविरोधात केलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी भागिदारी होय.


पाथुम निसांका आणि कुसल मेंडिस यांची अर्धशतकी खेळी - 
पाथुम निसांका आणि कुसल मेंडिस यांनी दमदार फलंदाजी करत अर्धशतकी खेळी केली. पाथुम निसांकाने 52 आणि कुसल मेंडिसने 57 धावांची खेळी केली. पाथुम निसांकाने 37 चेंडूत 52 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान निसांकाने दोन षटकार आणि चार चौकार लगावले. तर कुसल मेंडिसने 37 चेंडूत 57 धावांची खेळी केली. या खेळीत चार चौकार आणि तीन षटकार लगावले. या दोघांच्या खेळीच्या जोरावर श्रीलंकाने दमदार सुरुवात केली. 


भानुका राजपाक्षे-दासुन शनाका यांची मॅच विनिंग फलंदाजी
दासुन शनाका आणि भानुका राजपाक्षे यांनी मोक्याच्या क्षणी नाबाद भागिदारी करत श्रीलंकेला विजय मिळवून दिला. दासुन शनाका आणि भानुका राजपाक्षे यांनी 34 चेंडूत 64 धावांची भागिदारी केली.  दासुन शनाकानं कर्णधाराला साजेशी 33 धावांची खेळी केली तर भानुका राजपाक्षे याने 25 धवाा करत कर्णधाराला साथ दिली. 


चहलचा भेदक मारा - 
युजवेंद्र चहलने अचूक टप्यावर गोलंदाजी करत श्रीलंकेची सलामी जोडी फोडली. चहलने 12 व्या षटकात भारताला पहिलं यश मिळवून दिलं. त्यानंतर श्रीलंकेची फलंदाजी ढासळली. चहलने चार षटकार 34 धावांच्या मोबदल्यात तीन बळी घेतले. चहलच्या भेदक गोलंदाजीमुळे भारताच्या विजयाच्या आशा जिवंत झाल्या होत्या. चहलनंतर अश्विननेही विकेट घेत भारताच्या विजयाच्या पल्लवीत केल्या. पण अखेरच्या चार षटकांत भारतीय गोलंदाजांना एकही विकेट घेता आली नाही. त्यामुळे भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. 


दरम्यान, भारतानं नाणेफेकीचा कौल गमावला होता. प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्माच्या विस्फोटक अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघानं प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 8 गड्यांच्या मोबदल्यात 173 धावा केल्या. 


रोहित शर्माची विस्फोटक फलंदाजी -
केएल राहुल आणि विराट कोहली स्वस्तात माघारी परतल्यानंतर रोहित शर्मानं भारताचा डाव सावरला. रोहित शर्मानं सूर्यकुमार यादवसोबत भारतीय संघाची धावसंख्या वाढवली. रोहित शर्मानं 41 चेंडूत 72 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान रोहित शर्मानं चार षटकार आणि पाच चौकार लगावले. रोहित शर्मानं सूर्यकुमार यादवसोबत 58 चेंडूत 97 धावांची भागिदारी केली. रोहित-शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्या फलंदाजीमुळे भारताचा डाव सावरला.


सूर्यकुमार यादवची छोटेखानी खेळी - 
दोन विकेट लागोपाठ पडल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मा यांनी भारताचा डाव सावरला. सूर्यकुमार यादवनं रोहित शर्माला मोलाची साथ दिली. सूर्यकुमार यादवनं 34 धावांची छोटेखानी खेळी केली. या खेळीदरम्यान सूर्यकुमारनं एक चौकार आणि एक षटकार लगावला. 


फलंदाजांचा पुन्हा फ्लॉप शो - 
रोहित शर्मानं विस्फोटक फलंदाजी करत डाव सावरल्यानंतर मधल्या फळीतील फलंदाजांनी निराशा केल्यामुळे भारतीय संघाचा डाव कोसळला. राहुल 6, विराट कोहली 0, हार्दिक पांड्या 17, ऋषभ पंत 17 आणि दीपक हुडा 3 धावा काढून बाद झाले. ठराविक अंतराने विकेट पडल्यामुळे भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले.  


विराट कोहली गोल्डन डकचा शिकार -
आशिया चषकातील करो या मरो लढतीत टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली शून्यावर बाद झाला.  विशेष म्हणजे, आशिया चषकाच्या इतिहासात विराट कोहली पहिल्यांदाच शून्यावर बाद झालाय. विराट कोहलीनं तीन सामन्यात 155 धावांचा पाऊस पाडला होता. पाकिस्तानविरोधात नुकत्याच झालेल्या सामन्यात विराट कोहलीनं दमदार अर्धशतक झळकावलं होतं. तुफान फॉर्ममध्ये असणाऱ्या विराट कोहलीला दिलशान मदुशंकानं त्रिफाळाचित बाद करत श्रीलंकेला मोठं यश मिळवून दिलं.  


राहुलचा पुन्हा फ्लॉप शो - 
दुखापतीनंतर भारतीय संघात स्थान मिळवणाऱ्या राहुलला आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आलेली नाही. राहुलला आतापर्यंत एकाही सामन्यात अर्धशतकी खेळी करता आली नाही. राहुलचा फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेचा विषय ठरला आहे.