दुबई : आशिया चषक स्पर्धेत अफगाणिस्तानने भारताला 253 धावांचं आव्हान दिलं आहे. 50 षटकांत अफगाणिस्तानने आठ बाद 252 धावांची मजल मारली. सलामीवीर मोहम्मद शहजादने केलेल्या 124 धावांच्या जबरदस्त खेळीमुळे अफगाणिस्तानच्या डावाला आकार आला.
शहजादने 11 चौकार आणि सात षटकार लगावत 116 चेंडूंमध्ये 124 धावा ठोकल्या. शहजादचं हे पाचवं वनडे शतक ठरलं. शहजादला समोरच्या एंडने मोहम्मद नबीने दमदार साथ दिली. त्याने 56 चेंडूंत तीन चौकार आणि चार षटकारांसह 64 धावांची खेळी केली.
भारताकडून रवींद्र जाडेजाने तीन आणि कुलदीप यादवने दोन फलंदाजांना माघारी धाडलं. खलील अहमद, दीपक चहार आणि केदार जाधवने प्रत्येकी एक विकेट काढली.
आशिया चषकाच्या सुपर फोर साखळीत भारत आणि अफगाणिस्तान संघांमधल्या सुपर फोर सामना दुबईत सुरु आहे. या सामन्यात अफगाणिस्तानचा कर्णधार असघर अफगाणने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली.
कर्णधार रोहित शर्माने या सामन्यातून विश्रांती घेतली असून, त्याच्या अनुपस्थितीत टीम इंडियाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी महेंद्रसिंग धोनीच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. धोनीचा कर्णधार या नात्याने हा दोनशेवा वन डे आंतरराष्ट्रीय सामना आहे.
शिखर धवन, जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार आणि यजुवेंद्र चहल या प्रमुख शिलेदारांनाही या सामन्यातून विश्रांती देण्यात आली आहे. त्यांच्याऐवजी लोकेश राहुल, मनीष पांडे, खलील अहमद, सिद्धार्थ कौल आणि दीपक चहार यांना खेळण्याची संधी देण्यात आली आहे.