दुबई : टीम इंडियानं सुपर फोर सामन्यात पाकिस्तानचा नऊ विकेट्सनी धुव्वा उडवून, आशिया चषकाच्या फायनलचं तिकीट कन्फर्म केलं आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि शिखर धवननं झळकावलेली वैयक्तिक शतकं टीम इंडियाच्या दणदणीत विजयाचं वैशिष्ट्य ठरलं.


रोहित आणि शिखरने सलामीला 210 धावांची भागीदारी रचली. शिखर धवननं शंभर चेंडूंत 16 चौकार आणि दोन षटकारांसह 114 धावांची खेळी उभारली. त्याचं वन डे कारकीर्दीतलं हे पंधरावं शतक ठरलं. रोहित शर्मानं वन डे कारकीर्दीतलं एकोणिसावं शतक साजरं केलं. भारतीय कर्णधारानं 106 चेंडूंत सात चौकार आणि तीन षटकारांसह शतक झळकावलं.

पाकिस्ताननं टीम इंडियाला विजयासाठी 238 धावांचं आव्हान दिलं होतं. अनुभवी शोएब मलिक आणि कर्णधार सरफराझ अहमद यांनी चौथ्या विकेटसाठी रचलेल्या 107 धावांच्या भागिदारीनं पाकिस्तानला 50 षटकांत सात बाद 237 धावांची मजल मारून दिली.


या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानची तीन बाद 58 अशी घसरगुंडी उडवली होती. पण सरफराझ अहमदनं 44 धावांची आणि शोएब मलिकनं 78 धावांची खेळी करून पाकिस्तानच्या डावाला आकार दिला. मग असिफ अली 30 धावांची धडाकेबाज खेळी केली. त्यामुळे पाकिस्तानला टीम इंडियासमोर 238 धावांचं चांगलं आव्हान उभं करता आलं आहे.


भारताकडून जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी दोन विकेट पटकावल्या. बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात चार विकेट पटकावणाऱ्या रवींद्र जाडेजाला मात्र या सामन्यात एकही विकेट घेत आली नाही.


सामन्यात पाकिस्ताननं नाणेफेक जिंकून, पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकल्यास भारताचं आशिया चषकातील फायनलचं तिकीट जवळपास निश्चित होणार आहे.