दुबई: रोहित शर्माच्या टीम इंडियानं पाकिस्तानचा नऊ विकेट्सनी धुव्वा उडवून, आशिया चषकाच्या फायनलचं तिकीट कन्फर्म केलं. या फायनलमध्ये खेळण्याआधी भारतीय संघाला आज सुपर फोर सामन्यात अफगाणिस्तानशी दोन हात करण्याची संधी मिळणार आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या या सामन्यात आपली मधली फळी निरखून पाहण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न राहिल.
आशिया चषकात भारतानं सलग चार सामने जिंकण्याचा पराक्रम गाजवला. या चारही सामन्यांमध्ये भारताच्या सलामीच्या फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी सातत्यपूर्ण कामगिरी बजावली. त्यामुळं मधल्या फळीच्या फलंदाजांवर फारसा ताण आलेला नाही. त्यामुळंच अफगाणिस्तानविरुद्धचा सामना म्हणजे फायनलच्या दृष्टीनं मधल्या फळीतल्या फलंदाजांना निरखून घेण्याची टीम इंडियासाठी अखेरची संधी आहे.
दुसरीकडे अफगाणिस्तानला हलक्यावर घेऊन चालणार नाही. कारण या स्पर्धेत अफगाणिस्तानने श्रीलंका आणि बांगलादेशला चांगलेच दणके दिले. त्यामुळे अफगाणिस्तानचा संघही धोकादायक ठरला आहे. या मालिकेचा शेवट विजयाने करण्याचं ध्येय अफगाणिस्तानचं असेल.
गुणतालिकेत सध्या अफगाणिस्तान तळाला आहे. तर पाकिस्तान आणि बांगलादेशकडे 2-2 गुण आहेत. जर अफगाणिस्तानने आजचा सामना जिंकला, तरीही ते फायनलमध्ये जाणं शक्य नाही. कारण भारताने आधीच फायनलमध्ये धडक दिली आहे, तर आज पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात जो जिंकेल तो फायनलमध्ये जाईल. जर पाक-बांगलादेश यांच्यातील सामना रद्द जरी झाला तरी दोघांना एक-एक गुण मिळेल आणि ज्याचं रन रेट जास्त, तो फायनलमध्ये खेळेल. या अंकगणितामध्ये अफगाणिस्तान कुठेच बसत नाही, त्यामुळे त्यांच्यासाठी फायनलचं दार बंद आहे.
अफगाणिस्तानची गोलंदाजी
दरम्यान आजच्या सामन्यात भारतीय फलंदाजांना अफगाणिस्तानच्या धोकादायक गोलंदाजीचा सामना करायचा आहे. अफगाणिस्तानकडे चकवा देणारे फिरकीपटू आहेत. राशिद खान हा त्यांचा हुकमी एक्का आहे. याशिवाय मुजीब उर रहमान, मोहम्मद नबी यांची गोलंदाजीही धारदार आहे. त्यामुळे भारतीय फलंदाज या गोलंदाजीचा सामना कसा करतात ते पाहावं लागेल.
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन (उप कर्णधार), लोकेश राहुल, अंबाती रायडू, मनीष पांडे, केदार जाधव, महेंद्रसिंह धोनी, दिनेश कार्तिक, दीपक चहर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, सिद्धार्थ कौल आणि खलील अहमद.
अफगानिस्तान : असगर अफगान (कर्णधार), मोहम्मद शहजाद (विकेटकीपर), रहमत शाह, इंसानउल्लाह जनत, हशतमुल्लाह शाहिदी, मोहम्मद नबी, गुलबादिन नाइब, राशिद खान, अफताब आलम, मुजीब उर रहमान, जावेद अहमदी, मुनीर अहमद, नाजीबुल्लाह जादरान, सायेद शिरजाद, वफादार मोमंद आणि शमिउल्लाह शेनवारी.