दुबई : रोहित शर्माच्या टीम इंडियानं बांगलादेशवर अखेरच्या चेंडूवर तीन विकेट्सनी चुरशीचा विजय मिळवला आणि आशिया चषकावर सातव्यांदा आपलं नाव कोरलं. बांगलादेशनं अंतिम सामन्यात टीम इंडियाला विजयासाठी 223 धावांचं आव्हान दिलं होतं. सामन्यात टीम इंडियानं अखेरच्या चेंडूवर बांगलादेशवर तीन विकेट्सनी विजय मिळवला.


भुवनेश्वर कुमार बाद झाला, त्या वेळी भारताला अकरा चेंडूंत विजयासाठी नऊ धावा हव्या होत्या. आणि हाताशी केवळ तीन विकेट्स होत्या. केदार जाधवच्या मांडीचे स्नायू दुखावल्यामुळं तो मोठे फटके खेळू शकत नव्हता. त्या कठीण परिस्थितीत जाधव आणि कुलदीप यादवनं नेटानं खेळून विजयाचं समीकरण एका चेंडूत एका धावेवर आणलं. मग महमदुल्लाहच्या अखेरच्या चेंडूवर जाधव आणि यादवनं लेग बाय घेऊन भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.


भारताकडून कर्णधार रोहित शर्मानं 48 धावा बनवल्या. महेंद्रसिंह धोनी (36) आणि दिनेश कार्तिकनं (37) विजयामध्ये आपलं योगदान दिलं. त्याआधी प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशच्या लिटन दास आणि मेहदी हसननं 21 षटकांत दिलेली 120 धावांची सलामी टीम इंडियाच्या चाहत्यांना धडकी भरवणारी होती.


पण त्यानंतर भारताच्या फिरकी गोलंदाजांनी कमाल केली. केदार जाधवनं मेहदी हसनला बाद करून सलामीची जोडी फोडली. आणि मग बांगलादेशचा अख्खा डाव 222 धावांत गडगडला. भारताकडून कुलदीप यादवनं तीन, केदार जाधवनं दोन तर यजुवेंद्र चहलनं आणि जसप्रीत बुमरानं प्रत्येकी एक विकेट घेतली.


भारताच्या फिरकी त्रिकूटानं बांगलादेशचा डाव 49व्या षटकांत 222 धावांत गुंडाळला. सलामीच्या लिटन दासनं 117 चेंडूंत बारा चौकार आणि दोन षटकारांसह 121 धावांची खेळी उभारली. त्याचं वन डेतलं हे पहिलं शतक ठरलं. लिटन दासनं मेहदी हसनच्या साथीनं 120 धावांची सलामी दिली. त्याच सलामीच्या भक्कम पायावर बांगलादेशला 222 धावांची मजल मारता आली. मेहदी हसननं 32 आणि सौम्या सरकारनं 33 धावांची खेळी केली.