षटकार ठोकून अश्विनचं खणखणीत शतक
एबीपी माझा वेब टीम | 10 Aug 2016 05:02 PM (IST)
सेंट लुशिया: सेंट लुशिया कसोटीत टीम इंडियाचा ऑलराउंडर रविचंद्रन अश्विननं षटकार ठोकून आपलं शतक साजरं केलं. 265 चेंडूत अश्विननं 5 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीनं शतक पूर्ण केलं. अश्विनचं या कसोटी मालिकेतील हे दुसरं शतक आहे. या सामन्यात विंडीज गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्यासमोर भारताच्या टॉप ऑर्डरनं अक्षरश: नांगी टाकली. शिखर धवन एक, तर कर्णधार विराट कोहली तीन धावांवर माघारी परतले. मग लोकेश राहुलनं अजिंक्य रहाणेच्या साथीनं तिसऱ्या विकेटसाठी 58 धावांची भागीदारी रचून भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. लोकेश राहुल 50 धावांवर बाद झाला. तर रहाणे 35 आणि त्यानंतर आलेला रोहित शर्माही अवघ्या नऊ धावा करुन माघारी परतला. त्य़ामुळे भारताची पाच बाद 126 अशी अवस्था झाली होती. मात्र, अश्विन आणि रिद्धीमान साहानं सहाव्या विकेटसाठी अभेद्य भागीदारी रचून टीम इंडियाचा डाव सावरला. भारतानं 300 धावांचा टप्पाही पार केला आहे. अश्विनसोबत साहानं देखील उत्कृष्ट खेळीचा नमुना पेश केला. रिद्धीमान सध्या 96 धावांवर खेळतो आहे. --