नवी दिल्ली : टीम इंडियाचा फिरकीपटू रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जाडेजाने कसोटी गोलंदाजांच्या आयसीसी क्रमवारीत तब्बल 42 वर्षांनी नवा इतिहास घडवला आहे. दोघेही आयसीसी कसोटी क्रमवारीत अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर विराजमान झाले आहेत.
1974 साली बिशनसिंग बेदी आणि भागवत चंद्रशेखर या दिग्गजांनी आयसीसी क्रमवारीत अनुक्रमे पहिलं आणि दुसरं स्थान मिळवलं होतं. त्यानंतर 2016 सालच्या अखेरीस अश्विन आणि जाडेजा दोन भारतीय गोलंदाज आयसीसी क्रमवारीत पहिल्या दोन स्थानावर विराजमान झाले आहेत.
जाडेजाने चेन्नई कसोटीत दहा विकेट्स घेऊन कसोटी गोलंदाजांच्या आयसीसी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. चेन्नई कसोटीतल्या कामगिरीने जाडेजाला 66 गुणांची कमाई करून दिली असून, त्याच्या खात्यात एकूण 879 गुण झाले आहे.
भारताचाच रवीचंद्रन अश्विन कसोटी गोलंदाजांच्या आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानावर कायम आहे. अव्वल स्थानावरच्या अश्विनपासून जाडेजा केवळ आठ गुणांनी दूर आहे. आश्विनच्या खात्यात सध्या 887 गुण जमा आहेत.