मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी जलदगती गोलंदाज आशिष नेहरा याच्या पत्नीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. नेहराची पत्नी रुश्मानेच मंगवारी इन्स्टाग्रामवर हॉस्पिटलमधील एक फोटो शेअर केला. पूर्वीपेक्षा आता प्रकृती ठीक असल्याचे संकेत तिने दिले आहेत.

रुश्मा नेहरा हॉस्पिटलमध्ये कोणाचातरी आधार घेत चालत असल्याचं फोटोमध्ये दिसत आहे. "योग्य दिशेने टाकलेली छोटी पावलं. इन्स्टाग्रामवर दिसतं तसं आयुष्य कायम नसतं. मला फक्त संघर्षाचा खरा क्षण शेअर करायचा आहे," असं कॅप्शन तिने फोटोला दिलं आहे.


या फोटोवर फॉलोअर्स आणि नेहराच्या चाहत्यांनी रुश्मा लवकर बरी व्हावी, यासाठी प्रार्थना केल्या आहेत. "ज्याप्रकारे नेहरा सामन्यात पुनरागमन करत असे, तसंच तुम्ही बऱ्या व्हा," असं एका चाहत्याने म्हटलं आहे.

दरम्यान, रुश्मा नेहरला नेमकं काय झालं आहे, हे समजू शकलेलं नाही.

2002मध्ये भारतीय संघाच्या इंग्लंड दौऱ्यादरम्यान आशिष आणि रुश्मा यांची भेट झाली होती. पहिल्याच भेटीत आशिष रुश्माच्या प्रेमात पडला होता. 2002 पासून 2007 पर्यंत डेटिंग केल्यानंतर आशिषने रुश्माला लग्नासाठी प्रपोज केलं. आशिष आणि रुश्माला एरियाना आणि आरुष ही दोन अपत्य आहेत.