सिडनी: ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर तब्बल 4-0 अशी मात करुन मानाच्या अॅशेस मालिकेवर नाव कोरलं. शेवटच्या कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या उस्मान ख्वाजाची संयमी खेळी, मार्श बंधूंचं शतक आणि त्यानंतर कमिन्स आणि लियोनची जबरदस्त गोलंदाजी, यामुळे कांगारुंनी इंग्लंडवर एक डाव आणि 123 धावांनी पराभव केला.

या कसोटीत प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडने पहिल्या डावात सर्वबाद 346 धावा केल्या होत्या. कर्णधार ज्यो रुट 83 आणि डेविड मलनच्या 62 धावा वगळता, अन्य फलंदाजांना मोठी खेळी करता आली नव्हती.

ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने 4 तर स्टार्क आणि हेजलवूडने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या होत्या.

यानंतर मग ऑस्ट्रेलियन संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला. पहिल्याच डावात ऑस्ट्रेलियाने धावांचा डोंगर उभा केला.



डेव्हिड वॉर्नर 56, उस्मान ख्वाजा 171, स्टीव्ह स्मिथ 83, शॉन मार्श 156 आणि मिचेल मार्श 101 अशी टिच्चून फलंदाजी कांगारुंनी केली. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाने आपला पहिला डाव 7 बाद 649 धावांवर घोषित केला.

ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर पहिल्याच डावात तब्बल 303 धावांची आघाडी घेतली.

यानंतर मग इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आला. आधीच खचलेला इंग्लंड संघ ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर तग धरु शकला नाही.

शेवटच्या दिवशी इंग्लंडने 4 बाद 93 धावांवरुन खेळाला सुरुवात केली. मात्र कर्णधार ज्यो रुट फलंदाजीला उतरला नाही. जॉनी बेयरस्टो आणि मोईन अली हे मैदानात उतरले. पण नॅथन लायनने मोईन अलीला 13 धावांवर माघारी धाडलं.

यानंतर मग ज्यो रुटला मैदानात उतरावं लागलं. रुटने त्याचं अर्धशतक पूर्ण केलं. लंचपर्यंत इंग्लंचा अर्धा संघ तंबूत परतला होता. उपहाराला खेळ थांबला तेव्हा इंग्लंडने 5 विकेट गमावल्या होत्या, मात्र रुटने बेयरस्टोच्या साथीने 58 धावा केल्या होत्या.

मात्र उपहारानंतर रुट फलंदाजीला आलाच नाही. इंग्लंडचा दुसरा डाव 180 धावात गुंडाळला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने एक डाव आणि 123 धावांनी विजय मिळवला.