''मला माफ करा. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार म्हणून मी झाल्या प्रकाराची सर्व जबाबदारी स्वीकारतो. बॉल टॅम्परिंग माझी घोडचूक होती,'' अशी कबुली स्मिथने दिली. हे सांगतानाच त्याला रडूही कोसळलं.
स्मिथवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बॉल टॅम्परिंग प्रकरणात दोषी आढळल्यामुळे बारा महिन्यांची बंद घातली आहे. शिवाय त्याची ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आणि तो पुन्हा कधीही कर्णधार होऊ शकणार नाही, असंही स्पष्ट करण्यात आलं.
''ही डागाळलेली प्रतिमा सुधारणं माझ्यासाठी मोठं आव्हान असेल, मात्र या चुकीची मी कर्णधार या नात्याने जबाबदारी स्वीकारतो,'' असं तो म्हणाला.
''क्रिकेटमध्ये माझ्या देशाचं नेतृत्त्व करताना मला अभिमान वाटायचा आणि क्रिकेट हे माझं आयुष्य आहे. ते सर्व पुन्हा परत मिळवण्यासाठी मी प्रयत्न करेन. मला माफ करा, मी कुणावरही आरोप करणार नाही, याची संपूर्ण प्रकाराची जबाबदारी स्वीकारतो,'' असं स्मिथ म्हणाला.