नवी दिल्ली : भारताचे माजी सलामीवीर अरुण लाल गेल्या काही काळापासून क्रिकेट समालोचनापासूनही दूर होते. याचं कारण म्हणजे त्यांना जबड्याच्या कर्करोगाचं झालेलं निदान. सुदैवाने अरुण लाल यांचा लढा यशस्वी ठरल्याचं म्हटलं जात आहे.

 
जानेवारी 2016 मध्ये लाल यांना कर्करोग झाल्याचं समोर आलं. शनिवारी कोलकात्या एका रुग्णालयात त्यांच्यावर 14 तासांची शस्त्रक्रिया पार पडली. 60 वर्षीय अरुण लाल यांच्यावर जॉ रिप्लेसमेंट सर्जरी करण्यात आली.

'जबड्याचा कर्करोग हा दुर्मीळ आणि धोकादायक मानला जातो. वेळेतच याची लक्षणं ध्यानात आल्यामुळे उपचार शक्य झाले. हा माझ्यासाठी पुनर्जन्मच आहे. कर्करोगाविरोधातील लढा माझ्यासाठी कठीण होता, मी खरंच डॉक्टरांचा ऋणी आहे.' अशी प्रतिक्रिया अरुण लाल यांनी 'द हिंदू'ला दिली आहे.

 
युवराज सिंह पाठोपाठ अरुण लालही कर्करोगाशी यशस्वी लढा देणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत आले आहेत. लाल यांनी 1982 ते 1989 या कालावधीत 16 कसोटी आणि 13 एकदिवसीय सामने खेळले आहेत. श्रीलंकेविरोधात त्यांनी चेन्नईत खेळलेल्या पहिल्या सामन्यात 63 धावा ठोकल्या होत्या.