नवी दिल्ली : भारताचा जलद गोलंदाज मोहम्मद शमीविरोधात कौटुंबिक हिंसेप्रकरणी अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. पश्चिम बंगालच्या अलीपूर न्यायालयाने शमीला 15 दिवसांच्या आत हजर होण्याचे आदेश दिले आहेत. जर शमी 15 दिवसांच्या आत हजर झाला नाही, तर त्याला अटक करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.

हसीन जहाने तिचा पती मोहम्मद शमीविरोधात विवाहबाह्य संबंध ठेवल्याचा, घरगुती हिंसाचार आणि जीवे मारण्याच्या धमकीसह अनेक गंभीर आरोप केले होते. दोघांच्या घटस्फोटाचं प्रकरणही न्यायालयात सुरु आहे. न्यायालयाने शमीसह त्याचा भाऊ हसीद अहमद विरोधातही अटक वॉरंटही जारी केलं आहे. न्यायालयाने त्यांना 15 दिवसात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

शमी मॅच फिक्सिंगमध्ये सामील असल्याचाही खळबळजनक आरोप हसीनने केला होता. शमीचे पाकिस्तानी तरुणीसोबत संबंध असून तिच्याकडून शमीला पैसे मिळत असल्याचा आरोपही तिने केला होता. हसीन जहाने 2018 मध्ये शमीवर कौटुंबिक हिंसाचार आणि मॅच फिक्सिंगचे गंभीर आरोप केले होते. शमीविरोधात आयपीसी कलम 498 अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोहम्मद शमी भारतीय संघाच प्रमुख गोलंदाज आहे. शमीने काही दिवसांपूर्वीच कसोटी क्रिकेटमध्ये 150 विकेट घेतल्या होत्या. याशिवाय शमीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 70 सामन्यात 131 विकेट घेतल्या आहेत.

संबंधित बातम्या :