आधी मैदानाची सफाई, नंतर रेडिओ विक्री, अर्जुनचं सर्वत्र कौतुक
एबीपी माझा वेब टीम | 13 Aug 2018 10:57 AM (IST)
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा लेक अर्जुन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
लंडन: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा लेक अर्जुन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. निमित्त क्रिकेटचंच आहे. पण या वेळी स्वत: अर्जुन क्रिकेट खेळत नाही. भारत आणि इंग्लंड संघांमधल्या लॉर्डस कसोटीत पावसाचा वारंवार अडथळा आला. त्यावेळी मैदानातल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी लॉर्डसच्या ग्राऊंड्समनसोबत अर्जुनही प्रयत्न करताना दिसला. त्याच्या या कामाचं सोशल मीडियावरही कौतुक झालं. पण अर्जुन इतकंच करुन थांबला नाही, त्यानं लॉर्डसच्या बाहेर रेडिओचीही विक्री केली. हरभजनसिंगनं त्याचा रेडिओ विकतानाचा फोटो सोशल मीडियावरून शेअर केला आहे. अर्जुन तेंडुलकर शनिवारी स्टेडियमबाहेर डिजीटल रेडिओ विकत होता. डिजीटल रेडिओ एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे, ज्याद्वारे लाईव्ह कॉमेंट्री प्रसारित केली जाते. त्याद्वारे क्रिकेटप्रेमी ताजे अपडेट जाणून घेऊ शकतात. या रेडिओचे सिग्नल मर्यादित जागेत उपलब्ध असतात. या रेडिओ विक्रीपूर्वी अर्जुन तेंडुलकर शुक्रवारी मैदानातील कर्मचाऱ्यांना मदत करताना दिसला. पहिल्या दिवशी सचिननेही अर्जुनला ग्राऊंडस्टाफला मदत करताना पाहिलं होतं. लॉर्ड्स ग्राऊंडनेही आपल्या ट्विटरवरुन अर्जुनचा फोटो शेअर करत स्तुती केली होती.