मुंबई : इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघाने मंगळवारी (7 ऑगस्ट) लंडनमधील भारताच्या उच्च आयोगाला भेट दिली. यावेळी पूर्ण संघासह कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माही उपस्थित होती. या भेटीनंतर बीसीसीआयने एक फोटो आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला. परंतु या फोटोवर ट्विपल्सने नाराजी व्यक्त केली आहे.
अनुष्का पहिल्या रांगेत, उपकर्णधार शेवटच्या रांगेत
बीसीसीआयने शेअर केलेल्या फोटोमध्ये अनुष्का शर्मा पहिल्या रांगेत दिसत आहे. तर संघातील इतर खेळाडूंच्या पत्नी इथे उपस्थित नव्हत्या. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे मागच्या रांगेत उभा आहे. नियमानुसार, तो विराट कोहलीच्या बाजूला उभा असायला हवा होता. त्यामुळे ट्विपल्सने फोटोवर आक्षेप नोंदवला आहे.
बीसीसीआयचा नियम आणि अनुष्काची उपस्थिती
या भेटीत अनुष्काची उपस्थिती चर्चेचा विषय बनली होती. "एखाद्या दौऱ्याच्या पहिल्या दोन आठवड्यात खेळाडूंच्या पत्नी आणि गर्लफ्रेण्ड त्यांच्यासोबत जाऊ शकत नाहीत. तर दोन आठवड्यानंतर केवळ 14 दिवसांसाठीच त्या क्रिकेटरसोबत राहू शकतात," असा नियम बीसीसीआयने जारी होता. मात्र अनेक खेळाडूंच्या पत्नी सध्या लंडनमध्येच आहेत. त्यामुळे फक्त अनुष्काच्या उच्च आयोगातील उपस्थितीवर प्रश्न विचारले जात आहेत.
ट्विपल्सच्या प्रतिक्रिया
उपकर्णधार शेवटच्या रांगेत आणि भारतीय क्रिकेट संघाची फर्स्ट लेडी पहिल्या रांगेत. हेच लोक काही दिवसांपूर्वी ऑनलाईन लेक्चर देत होते.
बीसीसीआय खेळाडूंच्या पत्नींना अधिकृत दौऱ्यावर जाण्याची परवानगी कशी देते. तुमच्या संघाचे खेळाडू कामासाठी गेले आहेत की हनिमूनसाठी, ते आधी ठरवा.
पण इतर खेळाडूंच्या पत्नी तिथे का नाहीत? अनुष्का भारतातील ओळखची चेहरा आहे म्हणून का?
इथे अनुष्का शर्मा का आहे? ती अगदी मध्यभागी आहे तर उपकर्णधार शेवटच्या रांगेत
आणि इतर खेळाडूंच्या पत्नी इथे का नाहीत?