मुंबई : पुण्याच्या अंकिता गुंडनं यंदा सलग सहाव्या वर्षी राज्य विजेतेपद कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदकाचा मान मिळवला आहे. महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषदेच्या मान्यतेनं यंदा वर्धा जिल्हा तालीम संघानं या स्पर्धेचं नुकतंच आयोजन केलं होतं.

या स्पर्धेत अंकिता गुंडनं सलग सहाव्या वर्षी 62 किलो गटाचं सुवर्णपदक जिकलं. तिनं अंतिम फेरीत कल्याणच्या भाग्यश्री भोईरला कलाजंग डावावर चीतपट केलं. अंकिता ही आळंदीच्या जोग महाराज व्यायामशाळेची पैलवान आहे. ती आपले वडील दिनेश गुंड यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचा सराव करते.

अंकितानं पहिल्या फेरीत मुंबईच्या रुतिका मानकरला दहा सेकंदात चीतपट केलं. मग दुसऱ्या फेरीत तिनं हिंगोलीच्या शीतल चव्हाणला पंधरा सेकंदात अस्मान दाखवलं. तिनं तिसऱ्या फेरीत अमरावतीच्या आरती काकडला दहा सेकंदात चीतपट केलं.