मुंबई : विराट आणि अनुष्काच्या रिसेप्शनला सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर,संदीप पाटील आदी माजी कसोटीवीरांसह टीम इंडियाच्या शिलेदारांनीही उपस्थिती लावली. पण विशेष म्हणजे विराटनं दिलेल्या निमंत्रणाचा आदर राखून माजी प्रशिक्षक अनिल कुंबळेही मुंबईतल्या रिसेप्शनला आवर्जून हजर राहिला होता.
विराटच्या आग्रहामुळंच बीसीसीआयनं टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी अनिल कुंबळेऐवजी रवी शास्त्रीची नियुक्ती केली होती. त्यानंतर विराट आणि कुंबळे यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. पण ‘विरुष्का’च्या रिसेप्शनच्या निमित्तानं ती कटुता दूर झाल्याचं मानण्यात येत आहे.
दरम्यान, विरुष्काच्या या रिसेप्शनला क्रीडा आणि चित्रपटसृष्टीतले अनेक तारेतारका उपस्थित राहिले आहेत. त्या दोघांचा लग्नसोहळा ११ डिसेंबरला इटलीच्या सिएना प्रांतातल्या ब्युऑनकॉनव्हेन्टो शहरात संपन्न झाला. त्यानंतर २१ डिसेंबरला विरानुष्काच्या लग्नाचं पहिलं रिसेप्शन दिल्लीत पार पडलं होतं.