मुंबई : भारतीय संघाचे क्रिकेट कोच अनिल कुंबळे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. पद सोडताना कुंबळेंनी कर्णधार विराट कोहलीच्या वर्तनावर आश्चर्य व्यक्त केलं आहे. टीम इंडियाच्या कर्णधाराला माझ्या प्रशिक्षकपदावर आक्षेप असल्याचा आरोप त्यांनी पायउतार होताना केला आहे. 'गेलं वर्षभर मी टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून यशस्वी होण्याचं श्रेय कर्णधार, संपूर्ण संघ आणि सपोर्ट स्टाफला देतो.' असं कुंबळेंनी सुरुवातीला ट्वीटमध्ये म्हटलं आहे. 'माझ्या प्रशिक्षणाच्या स्टाईलवर आणि मी हेड कोच म्हणून कार्यरत राहण्यावर कर्णधाराचा आक्षेप असल्याचं काल पहिल्यांदाच मला बीसीसीआयकडून समजलं. मी कायमच कर्णधार आणि प्रशिक्षक यांच्या सीमा ओळखून काम करत असल्याने मला धक्का बसला' असं कुंबळेंनी पुढे म्हटलं आहे. 'बीसीसीआयने आमच्यातील मतभेद आणि गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला, मात्र मला असं वाटतं की आता हे पद सोडण्याची वेळ आली आहे. प्रशिक्षकपदाची धुरा बीसीसीआय ज्या व्यक्तीला पात्र समजेल, त्याच्याकडे सुपूर्द करण्याची मी विनंती करतो.' असंही ते पुढे म्हणाले. https://twitter.com/anilkumble1074/status/877218428318351361
टीम इंडियाचे प्रशिक्षक म्हणून अनिल कुंबळे यांचा आज शेवटचा दिवस होता. 23 जून 2016 रोजी टीम इंडियाचे माजी कर्णधार अनिल कुंबळे यांची मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाली होती.
अनिल कुंबळेंची कारकीर्द
कसोटी – 132 विकेट्स – 619 - कसोटीत सर्वाधिक विकेट्स काढणाऱ्या गोलंदाजांमध्ये मुरलीधरन आणि वॉर्ननंतर कुंबळे तिसऱ्या स्थानावर
- 1999 साली पाकिस्तानविरुद्ध दिल्ली कसोटीच्या एकाच डावात दहा विकेट्स काढण्याची कामगिरी
वन डे सामने – 271 विकेट्स – 337 - 1996 ते 2003 या कालावधीत चार वन डे विश्वचषक स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व
- 2007 ते 2009 या कालावधीत भारताच्या कसोटी संघाचं नेतृत्त्व. 14 कसोटींत 3 विजय, 5 पराभव
- 2012-2013 या कालावधीत रॉयल चॅलेन्जर्स बंगळुरुचा आणि 2013-2015 या कालावधीत मुंबई इंडियन्सचा चीफ मेन्टॉर
- 2010 कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचं अध्यक्षपद
- 2012 आयसीसीच्या क्रिकेट समितीचं अध्यक्षपद