नवी दिल्ली : मूळच्या कोल्हापूरच्या अनिकेत जाधवचा अंडर-17 फिफा विश्वचषकासाठी भारताच्या फुटबॉल संघात समावेश करण्यात आला आहे. आज (शुक्रवार) नवी दिल्लीत भारताचा पहिला सामना अमेरिकेविरुद्ध रंगणार आहे. या सामन्यात संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष हे कोल्हापूरच्या अनिकेत जाधववर असणार आहे. कारण महाराष्ट्रातून निवडला गेलेला तो एकमेव खेळाडू आहे. याचनिमित्तानं एबीपी माझानं आज अनिकेतच्या कुटुंबीयांशी खास बातचित केली.

‘खडतर परिस्थितीवर मात करत अनिकेतनं आज आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत माजली मारली आहे. त्यानं केलेली कठोर मेहनत आज अखेर फळास आली.’ असं अनिकेतचे वडील अनिल जाधव यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.

‘थोड्या वेळापूर्वी माझं अनिकेतशी बोलणं झालं तेव्हा तो म्हणाला ‘पप्पा आज सुट्टी देणार नाय!,’ म्हणजेच मी आज गोल करुन दाखवणार!’ असं सांगत असताना अनिकेतच्या वडिलांचा ऊर अभिमानानं भरुन आला होता.

‘अनिकेत लहान असताना मी त्याला शाहू स्टेडियममध्ये फुटबॉल मॅच पाहायला न्यायचो. आठ-नऊ वर्षाचा असेल तेव्हा तो. तेव्हापासून त्याला या खेळाविषयी आवड निर्माण झाली. त्यानंतर त्यानं या खेळालं वाहून घेतलं. मला विश्वास आहे की, तो आज गोल मारणारच!’ असं अनिकेतचे वडील यावेळी म्हणाले.

अनिकेतचे वडील कोल्हापुरातील शाहुपुरीमध्ये रिक्षा चालवतात. पण आपल्या मुलासाठी त्यांनी कधीही काही कमी पडू दिलं नाही.

अनिकेतला फुटबॉलची आवड ही लहानपणापासूनच होती. त्यामुळं त्याचं अभ्यासाकडे दुर्लक्ष होत होतं. अनिकेतचे मामा संजय जाधवांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी आपल्या भाच्याला हळदीमधल्या आपल्या घरी नेलं. तिथंच अनिकेतचं शिक्षण आणि फुटबॉलची बाराखडी गिरवणं सुरू झालं. अनिकेतची फुटबॉलमधली प्रगती पाहून मामानं त्याला सांगलीतल्या प्रशिक्षण केंद्रात धाडलं. तिथून आधी पुण्यातला एक क्लब आणि मग क्रीडाप्रबोधिनी असा प्रवास करून अनिकेत भारतीय संघात दाखल झाला आहे.

दरम्यान, यावेळी बोलताना अनिकेतची आई फारच भावूक झाली होती. ‘कोल्हापूरच्या अंबाबाईच्या आशीर्वादानं तो इथवरं पोहचला आहे. पुढंही त्यानं असंच यश मिळावावं असंच आम्हाला वाटतं.’ असं त्या यावेळी म्हणाल्या.

त्यामुळे आज अनिकेतनं मैदान मारावं अशीच इच्छा जाधव कुटुंबीयांसह संपूर्ण महाराष्ट्राचीही आहे.



VIDEO : खेळ माझा : कोल्हापूर : भारताच्या अंडर 17 फुटबॉल संघात अनिकेत जाधव