पहिल्या तीन वन डे सामन्यांसाठी भारतीय संघाची काल घोषणा करण्यात आली. त्यानंतर जाडेजाने नाराजी दर्शवणारं ट्वीट केलं. पण नंतर जाडेजाने तातडीने ते ट्वीट डिलिटही केलं.
टीम इंडियाची घोषणा झाली त्यावेळी जाडेजाला विश्रांती दिल्याचं कारण निवड समितीने दिलं. पण जाडेजाने केलेलं ट्वीट पाहता, त्याला वगळल्याचं दिसून येतंय.
“तुमच्या अपयशापेक्षा तुमच्या पुनरागमनावर भर द्या”, असं ट्वीट जाडेजाने केलं होतं. या ट्वीटसोबत त्याने घोड्यासोबतचा फोटो ट्वीट केला होता. मात्र त्याने ते तातडीने डिलीटही केलं.
जाडेजाच्या या ट्वीटवरुन त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत खेळायचं होतं, हे स्पष्ट होतं. पण निवड समितीने विश्रांतीच्या नावाखाली त्याला बाहेर बसवल्याचं चित्र आहे.
अश्विन-जाडेजाला विश्रांती
दरम्यान, निवड समितीने रोटेशन पॉलिसीनुसार फिरकीपटू आर अश्विन आणि रवींद्र जाडेजाला विश्रांती दिल्याचं म्हटलं आहे. मात्र या दोघांनाही नुकत्याच झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या वन डे आणि टी ट्वेण्टी सामन्यातूनही वगळण्यात आलं होतं.
जाडेजाची कामगिरी
जाडेजाने 2015 ते 2017 दरम्यान 27 वन डे सामन्यात केवळ 21 विकेट घेतल्या आहेत. तर 27 सामन्यात केवळ 223 धावाच त्याच्या नावे आहेत.
जाडेजाची कामगिरी पाहता, 2019 सालचा विश्वचषक नजरेसमोर ठेवून, निवड समितीने नव्या खेळाडूंना संधी देणं पसंत केल्याचं दिसून येतंय.
पहिल्या तीन वन डेसाठी भारतीय संघ
ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळवण्यात येणाऱ्या वन डे मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांसाठी रविवारी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली.
रोटेशन पॉलिसीनुसार फिरकीपटू रवींद्र जाडेजा आणि रवीचंद्रन अश्विन यांना विश्रांती देण्यात आली आहे.
श्रीलंका दौऱ्यात विश्रांती देण्यात आलेल्या गोलंदाज मोहम्मद शमी आणि उमेश यादव यांना संधी देण्यात आली आहे. काही अपवाद वगळता श्रीलंका दौऱ्यातीलच संघ यावेळीही निवडण्यात आला आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील वन डे मालिकेला 17 सप्टेंबरपासून चेन्नईतून सुरुवात होणार आहे. तर पहिला सराव सामना 12 सप्टेंबरला चेन्नईत खेळवण्यात येईल.
भारतीय संघ :
- विराट कोहली (कर्णधार)
- रोहित शर्मा
- शिखर धवन
- लोकेश राहुल
- मनीष पांडे
- केदार जाधव
- अजिंक्य रहाणे
- महेंद्रसिंह धोनी
- हार्दिक पंड्या
- अक्षर पटेल
- यजुवेंद्र चहल
- जसप्रीत बुमरा
- कुलदीप यादव
- भुवनेश्वर कुमार
- उमेश यादव
- मोहम्मद शमी