जर्मनीची अँजेलिक कर्बर विम्बल्डनची नवी विजेती
एबीपी माझा वेब टीम | 14 Jul 2018 10:48 PM (IST)
अँजेलिक कर्बरच्या कारकीर्दीतलं हे विम्बल्डनचं पहिलं आणि आजवरचं तिसरं ग्रँड स्लॅम विजेतेपद ठरलं.
विम्बलडन : जर्मनीची अँजेलिक कर्बर विम्बल्डनची नवी विजेती ठरली आहे. तिनं महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात माजी विजेत्या सेरेना विल्यम्सचा 6-3, 6-3 असा दोन सेट्समध्ये धुव्वा उडवला. अँजेलिक कर्बरच्या कारकीर्दीतलं हे विम्बल्डनचं पहिलं आणि आजवरचं तिसरं ग्रँड स्लॅम विजेतेपद ठरलं. सेरेना विल्यम्सला विम्बल्डन जिंकून कारकीर्दीतलं चोविसावं ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावण्याची संधी होती. तसं झालं असतं तर सेरेनानं मार्गारेट कोर्टच्या कारकीर्दीतल्या सर्वाधिक २४ विजेतीपदांच्या कामगिरीची बरोबरी साधली असती. पण अँजेलिक कर्बरनं सेरेनाचं आव्हान केवळ 65 मिनिटांत मोडीत काढलं आणि ती विम्बल्डनची नवी राणी बनली. अँजेलिक कर्बरनं याआधी २०१६ साली ऑस्ट्रेलियन आणि अमेरिकन ओपनचंही विजेतेपद पटकावलं होतं.