मुंबई : मेरी कोम पाठोपाठ महाराष्ट्राच्या अनंता चोपडेनं इंडोनेशियातील प्रेसिडेंट कप बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली. अनंताने 52 किलो गटात अफगाणिस्तानच्या रेहमानी रमीशला पराभवाची धूळ चारली. अनंताचं आंतरराष्ट्रीय स्तरावरचं हे पहिलंवहिलं सुवर्णपदक ठरलं.


अनंता चोपडेने प्रेसिंडेट कप बॉक्सिंग स्पर्धेच्या सलग दोन बाऊटमध्ये सरस खेळीवर एकतर्फी विजयाची नोंद केली. सेमीफायनल, फायनलची बाऊट युनिमस डिसिझनच्या आधारे जिंकली. त्याला तिन्ही पंचांनी सारखेच गुण दिले. त्यामुळे त्याने 5-0 ने विजयाची नोंद केली आहे.





अनंता चोपडे हा मूळचा बुलडाण्याच्या चिखली तालुक्यातील सावना गावचा आहे. मागील वर्षी पुण्याच्या आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्यूटमध्ये झालेल्या सीनियर राष्ट्रीय स्पर्धेत अनंतानं महाराष्ट्राला रौप्यपदक मिळवून दिलं होतं. तो अकोला जिल्ह्यातील राज्य शासनाच्या क्रीडा प्रबोधिनीत सराव करतो. या विजयाबरोबर त्याचा 2020 मधील ऑलिम्पिक प्रवेशाचा मार्गही सुकर झाला आहे.


तिथे त्याला महाराष्ट्राचे माजी शिवछत्रपती पुरस्कार विजेते बॉक्सर आणि भारतीय संघाचे प्रशिक्षक गिरीश पवार यांचं मार्गदर्शन लाभत आहे. अकोला आणि बुलडाण्यात त्याच्या यशाने चाहत्यांना मोठा आनंद झाला आहे.