नवी दिल्ली : इस्राईलममध्ये पंतप्रधान बेन्जामिन नेतन्याहू यांनी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. भारतातील निवडणुकांप्रमाणे इस्राईलमध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिष्मा पाहायला मिळत आहे. या निवडणुकीतील खास आकर्षण म्हणजे नेतन्याहू प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रुशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्या फोटोंचा वापर करत आहेत.

Continues below advertisement


नरेंद्र मोदी, डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतीन यांचा फोटो वापरुन परराष्ट्र धोरणाचं यश दाखवण्याचा प्रयत्न नेतन्याहू करत आहेत. नेतन्याहू यांनी जगभरातील नेत्यांना भेटल्याचा व्हिडीओही जारी केला आहे. या व्हिडीओत नेतन्याहू नरेंद्र मोदी, डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतीन यांना भेटत आहेत. वेगवेगळ्या कार्यक्रमांमधील हा व्हिडीओ आहे.





पंतप्रधान नेतन्याहू यांच्या पक्षाने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये नेतन्याहू नरेंद्र मोदी, डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत दिसत आहेत.





इस्राईलमध्ये यावर्षी एप्रिल महिन्यात निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत नेतन्याहू यांच्या पक्षाला पूर्ण बहुमत मिळू शकलं नाही आणि इतर पक्षाशी त्यांची युतीही झाली नाही. त्यामुळे इस्राईलमध्ये सप्टेंबर महिन्यात पुन्हा निवडणूक होत आहे.


नरेंद्र मोदींचं सरकार आल्यापासून भारताची इस्राईलशी जवळीक वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बेन्जामिन नेतन्याहू यांची अनेकदा भेट झाली आहे. गेल्या पाच वर्षांत मोदींनी इस्राईलचा आणि नेतन्याहू यांनी भारताचा दौरा केला आहे. तसेच इस्राईलमधील निवडणुकांआधी नेतन्याहू पुन्हा एकदा भारताचा दौरा करु शकतात.


भारताने काही महिन्यांपूर्वी आपली भूमिका बदलत संयुक्त राष्ट्रात आर्थिक आणि सामाजिक परिषदेत इस्राईलच्या एका प्रस्तावाला समर्थनही दिलं होतं.