मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली, ब्रायन लारा या दिग्गज क्रिकेटर्सला जमला नाही, तो विक्रम न्यूझीलंड क्रिकेट संघाची ऑलराऊंडर खेळाडू एमी सेटर्थवेटने केला आहे. एमीने चार वन डेमध्ये सलग चार शतक ठोकले आहेत.

महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारी ती पहिलीच महिला क्रिकेटर ठरली. आतापर्यंत श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराने सलग चार वन डेमध्ये सलग चार शतक करण्याचा विक्रम केला आहे. त्यामुळे एमीने संगकाराच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

गुरुवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात पाचवं शतक ठोकून संगकाराचा विक्रम मोडण्याची संधी एमीकडे आहे.

नोव्हेंबर 2016 पासून एमीची धावांची घोडदौड सुरु आहे. तिने नोव्हेंबर 2016 मध्ये झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात 137 धावांची नाबाद खेळी केली होती. तर त्यानंतरच्या पाकिस्तानविरुद्धच्याच सामन्यात नाबाद 115 धावा केल्या होत्या. पुन्हा त्याच मालिकेत अखेरच्या सामन्यात 99 चेंडूंमध्ये 123 धावा केल्या.