पुणे: 'शिवसेना बरोबर आल्याशिवाय फडणवीस सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडणं शक्य नाही. त्यामुळे याबाबत काय ते शिवसेनेनं ठरवावं. पण मला वाटतं की, शिवसेना धक्का मारुन बाहेर काढल्याशिवाय सत्ता सोडणार नाही.' अशा शब्दात काँग्रेस नेते नारायण राणेंनी शिवसेनेवर बोचरी टीका केली.
येत्या अधिवेशनात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस फडणवीस सरकारवर अविश्वास ठराव आणणार असल्याची चर्चाही सुरु आहे. त्याबाबत बोलताना राणे म्हणाले की, शिवसेना बरोबर आल्याशिवाय अविश्वास ठराव मांडणं शक्य नाही. त्यामुळे याबाबत काय ते शिवसेनेनं ठरवावं. पण मला वाटतं की, शिवसेना धक्का मारुन बाहेर काढल्याशिवाय सत्ता सोडणार नाही. असं राणे म्हणाले.
दुसरीकडे राणेंनी भाजपवरही निशाणा साधला. 'पराभव हा पराभव असतो त्यासाठी कारणं सांगू नयेत. पण भाजपनं या निवडणुका प्रामाणिकपणे जिंकलेल्या नाहीत.' असा गंभीर आरोप राणेंनी केला आहे. 'भाजपाच्या विजयावर ज्या काही शंका घेतल्या जात आहेत त्यात काहीतरी तथ्य असणारच.' अशी शंकाही राणेंनी व्यक्त केली आहे.
महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत राज्यभरात भाजपला अभूतपूर्व यश मिळालं. त्यानंतर सुरुवातीला निवडणुकीतील निकालांविषयी सोशल मीडियातून भाजपवर आरोप करण्यात येत होते. मात्र, आता काँग्रेस नेते राणेंनीही या गोष्टीकडे लक्ष वेधलं आहे. त्यामुळे आता काँग्रेस याप्रकरणी नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं आहे.
संबंधित बातम्या:
विधिमंडळ अधिवेशनात विरोधक अविश्वास ठराव मांडणार : सूत्र
राज्यात सर्व ठिकाणी काँग्रेससोबत आघाडी : शरद पवार