मुंबई : टीम इंडियाचा मधळ्या फळीतील फलंदाज अंबाती रायुडूने आज (3 जुलै) आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. वयाच्या अवघ्या 33 वर्षी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा करुन रायुडूने सगळ्यांना धक्का दिला. अंबाती रायुडूने याबाबत बीसीसीआयला ई-मेल करुन माहिती दिली.


आंध्र प्रदेशच्या या क्रिकेटपटूला विश्वचषकासाठी निवडलेल्या 15 जणांच्या संघात स्थान मिळालं नव्हतं. त्यावर बरीच चर्चाही झाली होती. शिखर धवन आणि मग विजय शंकर हे दुखापतीमुळे विश्वचषकातून बाहेर झाल्यानंतरही रायुडूला संधी मिळाली नाही. त्यांच्या जागी रिषभ पंत आणि मयांक अगरवाल यांना संघात स्थान मिळालं.

अंबाती रायुडूने आपल्या क्रिकेट कारकीर्दीत एकूण 55 एकदिवसीय सामन्यात भारताचं प्रतिनिधित्त्व केलं आहे. या 55 सामन्यात त्याने 1694 धावा केल्या, ज्यात 10 अर्धशतकांचा समावेश आहे. तर 6 ट्वेण्टी20 सामन्यांमध्ये त्याने एकूण 42 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये तो यंदाच्या मोसमात चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून खेळला होता. त्याने 147 आयपीएल सामन्यात 3300 धावा केल्या आहेत.