लंडन : इंग्लंडच्या अलिस्टर कूकने कसोटी संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. कूकने 2012 साली इंग्लंडच्या कर्णधारपदाची धुरा स्वीकारली होती. त्याच्याच नेतृत्त्वाखाली इंग्लंडनं 2013 आणि 2015 साली अॅशेस मालिका जिंकण्याचा पराक्रम गाजवला होता.


मात्र गेल्या वर्षी भारतातील कसोटी मालिकेत 0-4 असा पराभव स्वीकारावा लागल्यावर कूकने कर्णधारपदाविषयी पुनर्विचार करत असल्याचं कबूल केलं होतं. कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडचं नेतृत्त्व करणं हा माझा बहुमान समजतो. पण संघाचं हीत पाहता आणि माझ्या कारकीर्दीच्या दृष्टीनेही मी या जबाबदारीतून मोकळं होणं योग्य ठरेल, असं कूकनं म्हटलं आहे.

कूकची कर्णधार म्हणून कारकीर्द

अॅलेस्टर कूकनं इंग्लंडसाठी सर्वाधिक 59 कसोटी सामन्यांत नेतृत्त्वाची जबाबदारी पेलली होती. त्यात इंग्लंडने 24 वेळा विजय साजरा केला आणि 22 सामने गमावले होते तर 13 कसोटी अनिर्णित राहिल्या. कूकने 69 वन डे आणि एका ट्वेन्टी 20 सामन्यातही इंग्लंडचं नेतृत्त्व केलं होतं.

कूकनंतर कुणाला संधी?

इंग्लंडच्या वन डे आणि ट्वेन्टी 20 संघांची धुरा सध्या इयॉन मॉर्गनकडे आहे. आता कूकच्या राजीनाम्यानंतर इंग्लंडच्या कसोटी संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी ज्यो रूटवर सोपवली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, कर्णधारपदाचा राजीनामा दिला असला, तरी कूक फलंदाज म्हणून इंग्लंडसाठी आणखी काही काळ खेळत राहणार आहे. 32 वर्षीय कूकने  140 कसोटींमध्ये 46.45 च्या सरासरीने 11 हजार 57 धावा केल्या असून, त्याच्या खात्यात कसोटी क्रिकेटमध्ये 30 शतकं जमा आहेत.

” इंग्लंडचा मधल्या फळीतील हुकमी फलंदाज ज्यो रुट कर्णधारपद सांभाळण्यासाठी तयार आहे. भारताकडून झालेल्या पराभवामुळे माझ्या कर्णधारपदाबाबत प्रश्न उपस्थित होणं साहजिक आहे. मात्र मी पुढील वर्षापर्यंत माझ्या भविष्याबाबत कोणताही निर्णय घेऊ शकणार नाही”, असं कूकने भारतातील पराभवानंतर स्पष्ट केलं होतं.

संबंधित बातमी : जो रुट इंग्लंडचं कर्णधारपद भूषवण्यास सक्षम : अॅलिस्टर कूक