आंतरराष्ट्रीय क्रिकेटला पोखरणाऱ्या मॅचफिक्सिंगचा कतारच्या अल जझिरा चॅनेलनं पुन्हा पर्दाफाश केला आहे. दाऊद गँगच्या हस्तकांसह फिक्सिंगच्या कटात सहभागी असलेल्या भारत, श्रीलंका आणि पाकिस्तानच्या खेळाडूंचा आणि ऑफिशियल्सचा चेहरा अल जझिराच्या स्टिंग ऑपरेशननं जगासमोर आणला आहे. पण दुर्दैवाची बाब म्हणजे आयसीसी आणि अल जझिरा यांच्यामध्ये परस्परांना सहकार्य करण्याची तयारीच दिसत नाही. त्यामुळं स्टिंग ऑपरेशनच्या प्रसारणाला चोवीस तास उलटल्यानंतरही या प्रकरणात चौकशीचं गाडं पुढं सरकलेलं नाही. त्यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट :


आयपीएलच्या फेस्टिव्हलचा रंग उतरायच्या आत कतारच्या अल जझिराच्या स्टिंग ऑपरेशननं क्रिकेटच्या दुनियेला नवा धक्का दिला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मानगुटीवर बसलेलं मॅचफिक्सिंगचं भूत अजूनही खाली उतरलेलं नाही, हेच अल जझिराच्या स्टिंग ऑपरेशननं पुन्हा दाखवून दिलं आहे. अल जझिराच्या इन्व्हेस्टिगेटिव्ह टीमनं तब्बल दोन वर्षांहूनही अधिक काळ राबून केलेल्या स्टिंग ऑपरेशननं मॅचफिक्सिंगचे नवे धागेदोरे समोर आले आहेत.

अल जझिराच्या डेव्हिड हॅरिसन या रिपोर्टरनं त्यासाठी आपण ब्रिटिश उद्योगपती असल्याचं भासवून भारत, श्रीलंका आणि पाकिस्तानच्या विविध खेळाडू आणि ऑफिशियल्सशी संधान बांधलं होतं.

डेव्हिड हॅरिसन यांनी केलेल्या इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्टिंगमधून इंग्लंडच्या तीन आणि ऑस्ट्रेलियाच्या दोन दोषी खेळाडूंची नावं आपल्या हाती लागल्याचा अल जझिराचा दावा आहे. बीसीसीआयच्या दृष्टीनं दिलासा म्हणजे तूर्तास तरी विद्यमान टीम इंडियाचा एकही सदस्य फिक्सिंगमध्ये दोषी असल्याचं आढळून आलेलं नाही.

अल जझिराच्या या इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्टिंगमध्ये तब्बल चार कसोटी सामने फिक्स झाल्याचं आढळून आलं आहे. त्यापैकी तीन कसोटी सामन्यांमध्ये भारताचा समावेश होता. आपण पाहूयात कोणते आहेत हे कसोटी सामने

  • भारत वि. इंग्लंड, २०१६ सालचा चेन्नईमधला कसोटी सामना

  • श्रीलंका वि. ऑस्ट्रेलिया, २०१६ सालचा गॉलचा कसोटी सामना

  • भारत वि. ऑस्ट्रेलिया, २०१७ सालचा रांची कसोटी सामना

  • भारत वि. श्रीलंका, २०१७ सालचा गॉलचा कसोटी सामना


डेव्हिड हॅरिसन यांच्या इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्टमधून समोर आलेले निष्कर्ष पाहिलेत तर तुम्हाला धक्का बसेल.

हे निष्कर्ष पुढीलप्रमाणे आहेत...

  • आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फिक्सिंग अजूनही वेगवेगळ्या रुपात कायम आहे.

  • कसोटी सामन्यांमध्ये फिक्सिंग करणं तुलनेत अधिक सोपं असतं.

  • कसोटी सामन्याच्या विविध सत्रांमध्ये किती धावा होणार, किंवा किती विकेट्स जाणार याचं फिक्सिंग करता येतं.

  • कसोटी सामन्याचा निकाल आपल्याला हवा तसा यावा यासाठी ग्राऊंड्समनला लाखो रुपयांची लाच देऊन हवी तशी खेळपट्टी बनवता येते. यालाच ‘पीच फिक्सिंग’ म्हणतात.

  • डेव्हिड हॅरिसन यांच्या या इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्टमधून फिक्सिंगच्या काळ्या दुनियेतल्या अनिल मुनावरचा चेहरा समोर आला. अनिल मुनावर हा दाऊद गँगशी संबंधित असून, मॅचफिक्सिंगमध्येही आजही दाऊदचा शब्द अंतिम असल्याचं समोर येतं. त्याशिवाय मुंबईचा माजी रणजीपटू रॉबिन मॉरिस, पाकिस्तानचा हसन रझा, श्रीलंकेच्या दिलहारा लोकुहेट्टिगे, जीवन्था कुलतुंगा आणि थरिन्दू मेंडिस यांनाही अल जझिरानं बेनकाब केलं आहे.


आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, कोण आहे हा रॉबिन मॉरिस? आणि त्याचा गुन्हा काय?

  • रॉबिन मॉरिस हा एका जमान्यातला मुंबईचा प्रथम दर्जाच्या क्रिकेटमधला अष्टपैलू क्रिकेटर आहे. तो नव्वद दशकापासून थेट २००७ सालापर्यंत मुंबईकडून खेळला.

  • रॉबिन मॉरिस हा मूळचा सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी आणि अमोल मुझुमदारच्या शारदाश्रम विद्यामंदिरचा क्रिकेटर. त्यानंही आचरेकर सरांच्याच तालमीत आक्रमक फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजीचे धडे गिरवले आहेत.

  • याच रॉबिन मॉरिसवर श्रीलंकेतल्या गॉल कसोटीत ‘पीच फिक्सिंग’ करण्याचा आरोप आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या श्रीलंका दौऱ्यातल्या गॉल कसोटी आपल्याला हवी तशी खेळपट्टी बनवण्यासाठी ग्राऊंड्समनला लाच दिल्याचा मॉरिसवर आरोप आहे. अल-जझिराच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये मॉरिसनं ‘पीच फिक्सिंग’ची कबुली दिली आहे. श्रीलंकेच्या दिलहारा लोकुहेट्टिगे, जीवन्था कुलतुंगा आणि थरिन्दू मेंडिस या खेळाडूंचा त्याचा या कटात सहभाग असल्याचा पर्दाफाश अल-जझिरानं केला आहे.


अल जझिराच्या या स्टिंग ऑपरेशननं आयसीसीच्या झीरो टॉलरन्स धोरणाची अब्रू चव्हाट्यावर आणली आहे. पण आयसीसीची एवढी लाज गेल्यानंतरही या प्रकरणात चौकशीचं गाडं पुढे सरकलेलं नाही.

अल जझिरा म्हणतंय की, आम्ही सारे पुरावे आयसीसीला द्यायला तयार आहोत. पण आयसीसी म्हणते की, अल जझिराची आम्हाला सलग फुटेज द्यायची तयारी नाही. रॉबिन मॉरिस आणि त्याच्यासारखी संशयित मंडळीही आपल्याला सोयीस्कर दावे करत आहेत. त्यामुळं या प्रकरणात सत्य बाहेर यायच्या आधीच ते दडपलं जाईल का, अशी भीती सर्वसामान्य क्रिकेटरसिकाला वाटत आहे.

VIDEO : मॅच फिक्सिंगबाबत स्टिंग ऑपरेशन करुन अल जझिराचे विशेष वृत्त :



संबंधित बातमी : मुंबईचा माजी रणजीपटू रॉबिन मॉरिस फिक्सिंगच्या विळख्यात?