मुंबई: टीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेला इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीतून वगळ्यात आलं आहे. त्याच्या जागी मनिष पांडेला संघात स्थान देण्यात आलं आहे. तर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या जागी शार्दुल ठाकूरचा संघात समावेश करण्यात आला आहे.

टीम इंडियाचा मुंबईकर फलंदाज अजिंक्य रहाणेला इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित दोन्ही कसोटी सामन्यांना मुकावं लागणार आहे. बुधवारी मुंबईत सराव करत असताना अजिंक्य रहाणेच्या उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली. रहाणे नेट्समध्ये केवळ चारच चेंडू सराव करु शकला. त्यानंतर त्याला उपचारासाठी तातडीनं बॉम्बे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. त्यावेळी रहाणेच्या बोटाला फ्रॅक्चर असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळं रहाणेला मुंबई आणि चेन्नई कसोटीतून माघार घ्यावी लागली आहे.

अजिंक्य रहाणेऐवजी मनिष पांडेचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. तर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीही गुडघ्याच्या दुखापतीतून अजूनही सावरलेला नाही. त्यामुळं खबरदारीचा उपाय म्हणून पालघरच्या शार्दूल ठाकूरचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. शमी मुंबई कसोटीत खेळेल की नाही, याविषयीचा निर्णय गुरुवारी सकाळी कसोटी सुरु होण्याआधी घेतला जाईल. शमी मुंबई कसोटीत खेळू शकला नाही, तर शार्दूल ठाकूरला कसोटी पदार्पणाची संधी मिळू शकते.