भिवंडी : अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीला संपवणाऱ्या पत्नीला आणि तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे. पत्नी गुलशबा हिने 22 वर्षीय प्रियकराच्या साथीने राहत्या घरात अत्यंत निर्दयीपणे मुंडके धडावेगळं करून खून केल्याची धक्कादायक घटना 7 जानेवारी रोजी भिवंडीतील नागाव परिसरात उघडकीस आली होती.
हत्या झाल्यापासून फरार असलेल्या पत्नीसह तिच्या प्रियकराला उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातून शांतीनगर पोलिसांनी सापळा लावून गजाआड केलं. पत्नी गुलशबा (24) तिचा प्रियकर रिजवान मोहम्मद कुरेशी (22) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. तर कैफ उर्फ मनोजकुमार उर्फ राहूल जगदीशप्रसाद सोनी (30) असं हत्या करण्यात आलेल्या पतीचं नाव आहे.
मृत कैफ उर्फ मनोजकुमार सोनी याचा प्रेमविवाह गुलशबा हिच्याशी 7 वर्षांपूर्वी झाला होता. त्याने प्रेमिका गुलशबा हिच्याशी लग्न करण्यासाठी धर्मांतर केलं होतं. मृत मनोजकुमार हा गुलशबा आणि 3 मुलांसोबत नागाव परिसरातील विठ्ठल निवास इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर राहत होता. तो आग्रा येथे कटलरी सामान विक्रीचे काम करीत असल्याने दीड ते 2 महिन्यांनी घरी येत असे.
3 जानेवारी रोजी तो घरी आला असता त्याने पत्नीला रिजवानसोबत अश्लील चाळे करताना पाहिलं. त्यावरून दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. आपल्या अनैतिक संबंधात आता पती अडथळा ठरत आहे, असे वाटू लागल्याने पत्नी गुलशबा आणि प्रियकर रिजवान या दोघांनी संगनमत करून मनोजकुमार याचा धारदार शस्त्राने डोके धडावेगळे करून मृतदेह घरातच टाकून फरार झाले.
प्रेयसीसोबत फरार झालेल्या रिजवानने नातेवाईक शाबादला संपर्क करून घटनेची माहिती देऊन यातून मार्ग काढण्यास सांगितलं. मात्र शाबाद कुरेशी याने या घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ शांतीनगर पोलिसांना माहिती दिली. त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता घरात कैफ उर्फ मनोजकुमार यांचं शीर धडावेगळं केलेल्या अवस्थेत आणि त्यावर चादर ब्लँकेट ठेवलेलं होतं.
तो मृतदेह अत्यंत सडलेला होता. चार दिवसांपूर्वी त्याचा खुन करण्यात आला असल्याचं पोलिसांना तपासात आढळून आलं. याप्रकरणी पोलिसांनी मृताची पत्नी गुलशबा हिच्यावर संशय व्यक्त केला होता.
दरम्यान, हत्येच्या दिवशीच आरोपी पत्नी तिन्ही मुलांना आजीकडे सोडून प्रियकरासोबत उत्तर प्रदेशात पळून गेली होती. त्यानुसार शांतीनगर पोलिसांच्या दोन पथकांनी उत्तर प्रदेशमधील रामपूर जिल्ह्यातील एका गावातून पत्नी गुलशबा आणि रिजवान यांना सापळा रचून ताब्यात घेण्यात आलं. दोघांनाही भिवंडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने अधिक पोलीस कोठडी सुनावली असून शांतीनगर पोलीस अधिक तपास करत आहेत.