नागपूर : रणजी करंडकाच्या विजेतेपदानंतर अंडर 19 कूच बिहार स्पर्धेतही विदर्भानं पहिल्यांदाच विजेतेपदाचा मान मिळवला. अंतिम सामन्यात पहिल्या डावाच्या आघाडीवर विदर्भानं मध्य प्रदेशचा पराभव केला.


हा सामना नागपूरच्या व्हीसीए स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात विदर्भानं मध्य प्रदेशचा पहिला डाव 289 धावांत गुंडाळला.

कर्णधार अथर्व तायडेच्या त्रिशतकाच्या जोरावर विदर्भानं 614 धावांचा डोंगर उभारत पहिल्या डावात निर्णायक आघाडी घेतली. अथर्व तायडेनं 483 चेंडूत 34 चौकार आणि एका षटकारासह 320 धावांचं योगदान दिलं.

विदर्भाच्या दर्शन नळकांडे पहिल्या डावात चार विकेट्स घेतल्या, तर दुसऱ्या डावात पीआर रेखाडेने तीन बळी टिपले.

उपान्त्यपूर्व फेरीत विदर्भाने कर्नाटकचा धुव्वा उडवला होता, तर उपान्त्य फेरीत पंजाबवर मात केली होती.

विदर्भानं नुकतचं फैझ फझलच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच रणजी चषकावरदेखील आपलं नाव कोरलं होतं.