IPL मध्ये अनसोल्ड, इरफान पठाणचा चाहत्यांना भावनिक संदेश
एबीपी माझा वेब टीम | 22 Feb 2017 03:38 PM (IST)
मुंबई : आयपीएल 2017 च्या लिलावादरम्यान इरफान पठाणला कोणत्याही संघाने खरेदी केलं नाही. त्यामुळे त्याचे चाहते निराश झाले आहेत. त्याच्यापेक्षा कमी अनुभव असलेल्या खेळाडूंना संघांनी मोठी रक्कम देऊन खरेदी केलं. तर 50 लाख रुपयांची बेस प्राईस असलेला आयपीएल स्पेशालिस्ट अर्थात इरफान पठाणला कोणीही खरेदी केलं नाही. यामुळे 32 वर्षीय पठाणही दुखावला आहे. त्याने ट्विटरवर दु:ख शेअर केलं आहे. पठाणने चाहत्यांसाठी एक भावनिक मेसेज पोस्ट केला आहे. काय लिहिलं आहे मेसेजमध्ये? आपल्या मेसेजमध्ये इरफान पठाणने त्याच्या अडचणींचा उल्लेख केला आहे. पठाण म्हणतो, "2010 मध्ये फ्रॅक्चरनंतर त्याच्या पाठीवर पाच शस्त्रक्रिया झाली. पुन्हा क्रिकेट खेळू शकणार नाही, असं फिजिओने सांगितलं होतं. पण मी कोणतीही वेदना सहन करु शकतो, पण देशासाठी न खेळण्याची वेदना सहन करु शकत नाही. यानंतर मी फक्त मैदानातच परतला नाही तर टीम इंडियामध्ये पुन्हा आपलं स्थान मिळवलं. मी माझ्या करिअरमध्ये अनेक अडथळ्यांचा सामना केला. पण कधीही माघार घेतली नाही. हाच माझा स्वभाव आहे आणि तो कायम राहिल. आता माझ्यासमोर अडथळा आहे. पण तुमच्या प्रार्थना आणि शुभेच्छांमुळे तोही मी पार करेन. अजूनही माझ्या पाठिशी असलेल्या चाहत्यांसोबत मला ते शेअर करायचं होतं." https://twitter.com/IrfanPathan/status/834035543860207616 उत्तम कामगिरीमुळे चर्चेत सैयद मुश्ताक अली टी-20 टूर्नामेंटमध्ये इरफान पठाणने अतिशय उत्तम कामगिरी केली होती. वेस्ट झोनकडून खेळताना त्याने नॉर्थ झोनच्या शिखर धवन, युवराज सिंह आणि ऋषभ पंत यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला होता. मागील आयपीएलमध्ये तो रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघात होता. पण अनेक सामन्यांत त्याला अंतिम 11 मध्ये स्थान मिळालं नव्हतं. यानंतर मागील काही महिन्यांमध्ये इरफानने त्याच्या फिटनेसवर भर दिला होता.