आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बाहेर पडण्याचे आफ्रिदीने या महिन्याच्या सुरुवातीलाच संकेत दिले होते. आफ्रिदी आता जगभरातील विविध क्रिकेट लीगमध्ये खेळण्याची शक्यता आहे.
36 वर्षीय आफ्रिदीने कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधून याआधीच निवृत्ती घेतली होती. मात्र गेल्या वर्षी भारतात झालेल्या टी-ट्वेंटी विश्वचषकात त्याने पाकिस्तान संघाचं नेतृत्व केलं होतं. मात्र या मालिकेनंतर त्याने कर्णधारपदाचा राजीनामा देऊन टी-ट्वेंटीमध्ये संघाचं प्रतिनिधित्व केलं.
1996 साली श्रीलंकेविरुद्ध आफ्रिदीने धडाकेबाज खेळी करत केवळ 37 चेंडूत शतक ठोकलं होतं. तेव्हापासून त्याची ओळख स्फोटक खेळाडू म्हणून जगाला झाली. त्याचा हा विक्रम 17 वर्षांमध्ये कुणीही मोडू शकलेलं नाही.
आफ्रिदीने एक चांगला गोलंदाज ही ओळख मिळवत तो ऑलराऊंडर खेळाडूच्या रुपात खेळत होता. गोलंदाज म्हणून त्याने पाकिस्तानसाठी अनेक सामन्यांमध्ये महत्वाची भूमिका बजावली.
आफ्रिदीने एकूण 27 कसोटी सामन्यांमध्ये 1 हजार 176 धावा केल्या, तर 48 विकेट घेतल्या. आफ्रिदी 398 एकदिवसीय सामने खेळला असून त्याने यामध्ये 8 हजार 64 धावा ठोकल्या, तर 395 विकेट्स घेतल्या. 98 टी-ट्वेंटी सामन्यांमध्ये तो खेळला असून 1 हजार 405 धावा केल्या आहेत, तर 97 विकेट घेतल्या आहेत.