शारजा :  क्रिकेटच्या सामन्यात शेवटच्या क्षणी काय होईल सांगता येत नाही. हातातोंडाशी आलेला अपेक्षित विजय कधी निसटून जातो, तर कधी हातून गेलेली मॅच ऐनवेळी जिंकली जाते. अशाच इंटरेस्टिंग घडमोडींमुळे हा जंटलमन्स गेम लोकप्रिय आहे. झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान या दोन संघांमध्ये सुरु असलेल्या वनडे मालिकेत असाच एक इंटरेस्टिंग योगायोग घडला.


झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तानमध्ये पाच सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. मालिकेतला पहिला सामना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवख्या असलेल्या अफगाणिस्तान संघाने जिंकला. 9 फेब्रुवारीला झालेल्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानने झिम्बाब्वेवर 154 धावांनी मात केली.

झिम्बाब्वेने या पराभवाचा वचपा काढला नसता, तरच नवल. मात्र योगायोगाची गोष्ट म्हणजे अफगाणिस्तानचा पराभव करताना झिम्बाब्वेने एका रनचीही उधारी ठेवलेली नाही. म्हणजेच 11 फेब्रुवारीला झालेल्या दुसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेने अफगाणिस्तानवर 154 धावांनीच विजय मिळवला.

हा योगायोग तर काहीच नाही. खरी मजा तर पुढे आहे... पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 5 विकेट्स गमवून 333 धावा ठोकल्या होत्या, तर दुसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेने आधी फलंदाजी करुन तंतोतंत तितक्याच, म्हणजे 5 गडी गमवून 333 धावा केल्या. म्हणजेच दोन्ही वेळा संबंधित संघांसमोर सेम टार्गेट होतं.



पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानच्या 334 धावांच्या टार्गेटचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा संघ 179 धावांवर ऑलआऊट झाला, तर दुसऱ्या सामन्यात झिम्बाव्बेच्या 334 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा संघही सर्व गडी गमावून तितक्याच म्हणजे 179 धावांवर माघारी परतला.

योगायोगांची मालिका इथेच संपली, असं तुम्हाला वाटत असेल, तर... नाही. दोन्ही सामन्यांमध्ये दोन्ही संघांकडून एक-एक शतक साजरं करण्यात आलं. पहिल्या सामन्यात अफगाणिस्‍तानसाठी रहमत शाहने 114 धावांची खेळी केली तर दुसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेकडून ब्रेंडन टेलरने 125 धावा ठोकल्या. दोन्ही सामन्यांमधील स्कोअरबोर्ड सारखंच होतं. पहिला सामना अफगाणिस्तानने जिंकला, तर दुसरा झिम्बाब्वेने.

क्रिकेटच्या इतिहासात अशाप्रकारचा योगायोग दुर्मिळ मानला जात आहे. त्यामुळे हे सामने क्रिकेट रसिकांच्या कायम स्मरणात राहतील, यात शंका नाही.