अफगाणिस्तानची पहिली कसोटी मालिका टीम इंडियाविरोधात
एबीपी माझा वेब टीम | 11 Dec 2017 05:29 PM (IST)
भारत आणि अफगाणिस्तानमधील ऐतिहासिक नातेसंबंध लक्षात घेता बीसीसीआयने अफगाणिस्तानला पहिल्या कसोटी सामन्याचं निमंत्रण दिलं.
मुंबई : अफगाणिस्तान क्रिकेट संघाला येत्या जून महिन्यात कसोटी क्रिकेटचा दर्जा मिळाला आहे. त्यानंतर 2019-2020 च्या मोसमात अफगाणिस्तान आपला पहिला कसोटी सामना भारताविरुद्ध खेळणार आहे. भारत आणि अफगाणिस्तान संघांमधला हा कसोटी सामना भारतात खेळवण्यात येईल. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार अफगाणिस्तानचा पहिला कसोटी सामना 2019 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळवण्यात येणार होता. पण भारत आणि अफगाणिस्तानमधील ऐतिहासिक नातेसंबंध लक्षात घेता बीसीसीआयने अफगाणिस्तानला पहिल्या कसोटी सामन्याचं निमंत्रण दिलं. अफगाणिस्तान आणि आयर्लंड हे आयसीसीचा कसोटी दर्जा लाभणारे अनुक्रमे अकरावे आणि बारावे देश ठरतील. युद्धामुळे प्रभावित झालेल्या अफगाणिस्तान देशाला बीसीसीआयने आतापर्यंत अनेक वेळा मदत केली आहे. अफगाणिस्तान क्रिकेट संघाची आयर्लंडविरोधातील मालिका ग्रेटर नोएडामध्ये आयोजित करण्यात आली होती. राशिद खान आणि मोहम्मद नबी हे आयपीएलच्या लिलावात सहभागी झालेले अफगाणिस्तान संघातील पहिले दोन क्रिकेटपटू ठरले आहेत.