इंदूर : इंदूर कसोटीत टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध क्लीन स्वीपच्या तयारीत आहे. पण भारतीय खेळाडूंच्या सरावादरम्यान कर्णधार विराट कोहली वेगळाच क्लीन स्वीप करताना दिसला.
होळकर स्टेडियमवर सरावानंतर विराटनं तिथंच पडलेल्या पाण्याच्या रिकाम्या बॉटल्स उचलण्यास सुरुवात केली. ते पाहून एक अधिकारी धावत तिथं गेला. पण आम्ही कचरा केला आहे, तेव्हा आम्हीच उचलायला हवा, असं विराटनं त्याला सांगितलं.
काही दिवसांपूर्वीच गांधीजयंती निमित्त विराटनं टीम इंडियाच्या सदस्यांसह ईडन गार्डन्स स्टेडियमच्या स्टँड्समध्ये साफसफाई केली होती. पण केवळ एका दिवसापुरता स्वच्छतेचा मंत्र देऊन विराट थांबलेला नाही, तर स्वच्छतेचं महत्त्व त्याला पटल्याचं विराटनं दाखवून दिलं आहे.
विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही त्याबद्दल विराटची तारीफ केली आहे. 'एबीपी न्यूज'वर स्वच्छता मोहीम पाहिल्याचं मोदींनी आवर्जून सांगितलं. विराटनेही पंतप्रधानांचे आभार व्यक्त केले आहेत. तुमच्याकडूनच याची प्रेरणा घेतली, असंही तो म्हणाला.
https://twitter.com/imVkohli/status/784386770766958593