नालासोपारा: नालासोपारात एका पिसाळलेल्या मांजरीने चक्क आपल्याच मालकिणीचाच चावा घेतला आहे. अचानक पिसाळलेल्या मांजरीला पकडण्यासाठी अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आलं. अखेर दोन तासाच्या मेहनतीनंतर मांजरीला पकडण्यात यश आलं.
नालासोपारा पश्चिमेकडील रोहीणीकुंज या इमारतीत राहणाऱ्या जान्हवी चंपानेरकर यांच्या मांजरीने त्यांच्या दोन्ही हातावर आणि पायावर चावा घेऊन अक्षरश: चाळण केली आहे. आज सकाळी अकराच्या सुमारास मांजर अचानक पिसाळली आणि तिने आपल्या मालकिणीवरच हल्ला केला.
आज सकाळी जान्हवी आपल्या मांजरीला नाश्ता दिल्यानंतर अचानक मांजर पिसाळली. कसंबसं प्रसांगवधान राखून मांजरीला बाथरूम मध्ये बंद केलं आणि अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना बोलावलं. अग्निशमन विभागाच्या कर्मचा-यांनी बाथरुमच्या पोटमाळ्यामधून सुमारे दोन तासाच्या प्रयत्नानंतर तिला पकडलं. तरीही ती त्यांना देखील चावण्याचा प्रयत्न करीत होती.
जान्हवी यांच्या घरी ही माजंर साडेतीन महिन्याची असल्यापासून राहत होती. तिने तीन पिल्लांना जन्मही दिला आहे. मात्र आजच्या अचानक केलेल्या या हल्ल्याने चंपानेरकर कुंटुंबच हैराण झाले आहेत. सध्या मांजरीवर उपचार सुरु आहेत.