जोहान्सबर्ग : एबी डिव्हिलियर्सने दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. क्रिकेट साऊथ आफ्रिकाने त्याच्याजागी फाफ डू प्लेसिसची कर्णधारपदी निवड केली आहे.
हाशिम अमलाच्या राजीनाम्यानंतर एबी डिव्हिलियर्सकडे जानेवारीमध्ये कर्णधारपदाची धुरा सोपवली होती. इंग्लंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये त्याने दक्षिण आफ्रिका संघाचं नेतृत्त्व केलं होतं. दुखापतीमुळे त्याला न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून बाहेर राहावं लागलं होतं.
कोपऱ्याच्या दुखापतीतून पूर्णत: न सावरल्याने श्रीलंकाविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेला डिव्हिलियर्स मुकावं लागणार आहे.
"संघाचं हित माझ्या किंवा कोणत्याही व्यक्तीपेक्षा मोठं आहे. कसोटी संघाचं कर्णधारपद माझ्यासाठी सन्मानाची बाब होती. मी दोन मालिकेत खेळू शकलो नाही. आगामी श्रीलंका मालिकेबाबतही साशंक आहे. ऑस्ट्रेलियातील संघाची चांगली कामगिरी पाहता हे स्पष्ट आहे की, डू प्लेसिसकडे कर्णधारपदाची जबाबदारी द्यायला हवी," असं एबी डिव्हिलियर्स म्हणाला.