पंढरपूर : 60 सेकंदात म्हणजे एका मिनिटात 62 पुल-अप्स काढत आदर्श भोसले या तरुणाने विश्वविक्रम केला आहे. गेल्या दोन वर्षांपासूनच्या आदर्शच्या प्रयत्नाला अखेर यश आलं. त्याच्या या विक्रमाची गिनीज बुकमध्ये नोंद होईल, असा दावा त्याने केला आहे.

पंढरपूर शहरातील कंडरे फिटनेस हबमध्ये गिनीज रेकॉर्डच्या नियमानुसार त्याने पुल-अप्स काढायला सुरुवात केली. एका मिनिटात दोन वेळा ब्रेक घेत त्याने 62 पुल-अप्स काढत हा विक्रम केला. आदर्श पुणे येथील शाहू महाविद्यालयात कला शाखेत दुसऱ्या वर्षाला शिकत आहे.

यावेळी सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, सहाय्यक पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे , प्रांताधिकारी विजय देशमुख यांच्यासह अनेक अधिकारी आणि क्रीडा रसिक उपस्थित होते .

यापूर्वी पुल-अप्स क्रीडा प्रकारात पहिला विक्रम 9 जून 2015 रोजी सिंगापूरच्या एका खेळाडूने 43 पुल-अप्स काढत केला होता. यानंतर ऑक्टोबर 2015 मध्ये अमेरिकेच्या एका खेळाडूने 50 पुल-अप्स काढत हा विक्रम मोडला. 15 डिसेंबर 2016 रोजी अमेरिकेच्याच एका खेळाडूने 51 पुल-अप्स काढत नवीन विक्रम केला होता.

शेवटचा विक्रम बल्जेरियाच्या बोरिस नलबेंतोव  याच्या नावावर असून त्याने 17 जून 2017 रोजी 54 पुल-अप्स काढले होते. आदर्शने हा विश्वविक्रम भारताच्या नावावर केला आहे. 60 सेकंदात 62 पुल-अप्सचा काढणारा तो जगातील एकमेव खेळाडू ठरला.