मुंबई : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात लढत होणार आहे. बांगलादेशला भारताच्या तुलनेत कमकुवत समजलं जात असलं तरी जुने अनुभव पाहता टीम इंडियाचे शिलेदार ही चूक करणार नाहीत.
बांगलादेशने अनेकदा कुणी अंदाजही लावला नसेल, अशा परिस्थितीत बलाढ्य संघांना हरवलेलं आहे. बांगलादेशने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात जबरदस्त कामगिरी करत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. त्यामुळे बांगलादेशपासून असलेल्या धोक्यांपासून टीम इंडियाचा सावध राहण्याचा प्रयत्न करेल.
बांगलादेशपासून भारताला काय धोके?
1. भारतावर 2-1 ने मालिका विजय
बांगलादेशने भारताला 2007 सालच्या विश्वचषकात धूळ चारली होती. भारतासाठी हा पराभव धक्कादायक होता. असाच पराभवाचा धक्का बांगलादेशने भारताला अनेकदा दिला आहे. 2015 मध्ये झालेल्या वन डे मालिकेत बांगलादेशने भारतावर 2-1 ने विजय मिळवला होता. एवढंच नाही तर 2016 च्या टी-20 विश्वचषकात भारताची पराभवाची परिस्थिती झाली होती. मात्र महेंद्र सिंह धोनीच्या कामगिरीने भारताने हा सामना वाचवला.
2. सलामीवीर जोडीवर मदार
चॅम्पियन्स ट्रॉफीत टीम इंडियाच्या सलामीवीर जोडीने चांगली भागीदारी रचली असली तरी पहिल्या 10 षटकांमध्ये धावांची संख्या फारच कमी आहे. भारताने गेल्या तीन सामन्यात पहिल्या 10 षटकांमध्ये पाकिस्तानविरुद्ध 46, श्रीलंकेविरुद्ध 48, श्रीलंकेविरुद्ध 48 आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केवळ 35 धावा केल्या आहेत.
3. खराब क्षेत्ररक्षण
भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलचं तिकीट बूक केलं असलं तरी क्षेत्ररक्षण सुधारणं भारतासाठी महत्वाचं असणार आहे. कारण गेल्या काही सामन्यांमध्ये युवराज सिंह, केदार जाधव, रोहित शर्मा यांच्यासारख्या भरोशाच्या खेळाडूंकडून अनेक चुका झालेलं दिसून आलं.
पाकिस्ताविरुद्धच्या सामन्यात केदार जाधवने दोन झेल सोडले, हार्दिक पंड्याने श्रीलंकेविरुद्ध कुशल मेंडिस आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हाशिम आमलाचा झेल सोडला.
4. तमीम इकबालचा धोका
बांगलादेशचा स्फोटक फलंदाज तमीम इकबालला लवकरात लवकर माघारी पाठवण्याचं आव्हान भारतीय गोलंदाजांसमोर असेल. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात तमीम अपयशी ठरला असला तरी त्यापूर्वीच्या सामन्यांमध्ये त्याने बांगलादेशसाठी मोलाची भूमिका निभावली आहे. तमीमने इंग्लंडविरुद्ध 128, तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध 95 धावांची शानदार खेळी केली आहे. या चॅम्पियन्स ट्रॉफीत त्याच्या नावावर 223 धावा आहेत.
5. मुस्तफिजुर रहमानपासून सावधान!
भारतीय फलंदाजांनी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी केली असली तरीही बांगलादेशच्या गोलंदाजांपासून सावध राहणं गरजेचं आहे. कारण मुस्तफिजुर रहमान हा बांगलादेशचं खरं अस्त्र आहे. कारण त्याने भारताविरुद्ध आतापर्यंत 3 सामन्यात 13 विकेट घेतल्या आहेत. तर रुबल हुस्सेनने गेल्या 4 सामन्यात दोन वेळा विराट कोहलीला माघारी पाठवलं आहे.