पणजी, गोवा : महाराष्ट्राच्या खेळाडूंनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील जिम्नॅस्टिक्समध्ये वर्चस्व कायम राखताना शुक्रवारीही पदकांची लयलूट केली. महाराष्ट्राने पाच सुवर्ण, चार रौप्य व तीन कांस्य अशी एकूण 12 पदकांची कमाई केली. यात संयुक्ता काळेच्या दुहेरी सुवर्ण पदकांचा समावेश आहे.
महिलांच्या तालबद्ध जिम्नॅस्टिक्समधील बॉल रँकिंग प्रकारात संयुक्ता काळेने सुवर्णपदक जिंकताना 25.95 गुण नोंदवले. तिची सहकारी किमया कार्लेने कांस्यपदक जिंकले. तिला 25.15 गुण मिळाले. हरयाणाच्या लाइफ अडलाखाला रौप्य पदक मिळाले. याचप्रमाणे संयुक्ताने हूप प्रकारातही 26.25 गुणांसह सोनेरी यश मिळवले. महाराष्ट्राचीच निशिका काळे (23.45 गुण) रौप्य पदकाची मानकरी ठरली. तर हरयाणाच्या लाइफ अडलाखाला कांस्य पदक मिळाले
ट्रॅम्पोलीनमध्ये पहिली दोन्ही पदके जिंकून महाराष्ट्राने शानदार कामगिरी केली. राही पाखळेने सुवर्णपदक जिंकताना 43.88 गुणांची नोंद केली तर सेजल जाधवने 41.20 गुणांसह रौप्यपदक पटकावले. केरळच्या अन्विता सचिनला (40.17 गुण) कांस्य पदक मिळाले.
एरोबिक्समधील मिश्र दुहेरीत अद्वैत वझे व राधा सोनी यांनी सुवर्णपदक मिळवले त्यांनी 16.35 गुणांची नोंद केली. रौप्य पदक पश्चिम बंगालच्या अब्दुल चौधरी आणि सहिना यांनी तर कांस्य पदक गुजरातच्या निशांत चव्हाण आणि प्राकृती शिंदे यांनी पटकावले. सांघिक विभागातही महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळाले. त्यांनी 16.60 गुणांची कमाई केली.
एरोबिक्समधील ट्रायो प्रकारात आर्य शहा, स्मित शहा व उदय मढेकर यांनी रौप्य पदक जिंकले. त्यांना 17.10 गुण मिळाले. मणिपूरच्या संघाने सुवर्ण आणि सेनादलाने कांस्य पदक मिळवले.
आर्यने पुरुषांच्या वैयक्तिक विभागातही रुपेरी यश संपादन केले. त्याने 18.45 गुणांची नोंद केली. महिलांच्या वैयक्तिक विभागात साक्षी डोंगरेला (16.95 गुण) कांस्य पदक मिळाले. अरीहा पांगमबाम (मणिपूर) आणि माजिदा खातून (पश्चिम बंगाल) यांना अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदके मिळाली.
महिलांच्या कलात्मक जिम्नॅस्टिक्समधील अनइव्हन बार प्रकारात महाराष्ट्राच्या श्रद्धा तळेकरने 9.500 गुण मिळवत कांस्य पदक मिळवले. ओडीशाच्या प्रणती नायकला सुवर्णपदक मिळाले, तर बंगालच्या प्रणती दासला कांस्य पदक मिळाले. याचप्रमाणे टेबल व्हॉल्ट प्रकारात इशिता रेवाळेने11.650 गुण मिळवत कांस्य पदक प्राप्त केले. बंगालच्या स्वस्तिका गांगुलीलाही संयुक्तपणे कांस्य पदक मिळाले. ओडीशाच्या प्रणतीला सुवर्ण आणि त्रिपुराच्या प्रोतिष्ठा समंथाला कांस्य पदक मिळाले.