हैदराबाद: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या हैदराबाद कसोटीत  नाणेफेक जिंकून, प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजचा निम्मा संघ तंबूत परतला आहे. सलामीवीर पॉवेलला आर अश्विनने माघारी धाडलं. एक मोठा फटका खेळण्याच्या नादात पॉवेल जाडेजाकरवी झेलबाद झाला. पॉवेलने 23 धावा केल्या. तो बाद झाला त्यावेळी विंडीजची धावसंख्या 1 बाद 32 अशी होती. त्यानंतर ठराविक वेळेने भारतीय गोलंदाजांनी विंडिज फलंदाजांना माघारी धाडलं.


दरम्यान, विंडीजचा कर्णधार जेसन होल्डरने संघात पुनरागमन केलं आहे. दुसरीकडे भारतानेही संघात एक बदल केला आहे. मध्यमगती गोलंदाज शार्दूल ठाकूरला कसोटी पदार्पणाची संधी मिळाली आहे. मोहम्मद शमीला विश्रांती दिल्याने शमीऐवजी शार्दूलचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात येत आहे. भारतानं राजकोट कसोटी जिंकून दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे हैदराबादची कसोटी जिंकून मालिकेवर निर्विवाद वर्चस्व गाजवण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न राहील. दुसरीकडे वेस्ट इंडिजचा संघ या कसोटीत चांगली कामगिरी करुन भारताला रोखण्याचा प्रयत्न करेल. मात्र विंडिजच्या तुलनेत भारतीय संघ तगडा आहे.

राजकोटमध्ये विजय

विराट कोहलीच्या टीम इंडियाने राजकोट कसोटीत वेस्ट इंडिजचा तिसऱ्याच दिवशी एक डाव आणि 272 धावांनी धुव्वा उडवला. भारताने या विजयासह दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या कसोटीत टीम इंडियाने पहिल्या डावात 468 धावांची आघाडी घेऊन, विंडीजवर फॉलोऑन लादला होता. भारतीय गोलंदाजांनी विंडीजचा पहिल्या डावात अवघ्या 181 धावांत खुर्दा उडवला. विंडीजचा दुसरा डाव केवळ 196 धावांत गडगडला.


भारत विरुद्ध वेस्ट इंडिज मालिकेचं वेळापत्रक

भारत मायदेशात वेस्ट इंडीजविरुद्ध 2 कसोटी, 5 एकदिवसीय आणि 3 ट्वेण्टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना 4 ते 8 ऑक्टोबरदरम्यान राजकोटमध्ये आणि दुसरा सामना 12 ते 16 ऑक्टोबरदरम्यान हैदराबादमध्ये खेळवला जाणार आहे.

कसोटी मालिकेनंतर दोन्ही संघ 21 ऑक्टोबरपासून पाच सामन्यांची वनडे मालिकेत भिडणार आहेत. वनडे सीरिजचा पहिला सामना 21 ऑक्टोबरला गुवाहाटी, दुसरा 24 ऑक्टोबरला इंदूर, तिसरा 27 ऑक्टोबरला पुणे, चौथा 29 ऑक्टोबरला मुंबई आणि पाचवा 1 नोव्हेंबरला थिरुवनंतपुरममध्ये होणार आहे.

वेस्ट इंडीजविरुद्ध भारताचा कसोटी संघ - विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएल राहुल, पृथ्वी शॉ, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, मोहम्मद सिराज आणि शार्दूल ठाकूर

वन डे मालिकेसाठी भारतीय संघाची निवड

विंडीजविरुद्धच्या वन डे मालिकेतल्या पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. एम एस के प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय निवड समितीनं 14 सदस्यांचा भारतीय संघ जाहीर केला. निवड झालेल्या भारतीय संघात युवा यष्टिरक्षक रिषभ पंत हा एकमेव नवा चेहरा असेल. रिषभ पंतचा दिनेश कार्तिकच्या जागी संघात समावेश करण्यात आला आहे. तर भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराला विश्रांती देण्यात आली आहे. भारत आणि विंडीजमधल्या पाच वन डे सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना 21 ऑक्टोबरला खेळवण्यात येईल.

संबंधित बातम्या 

'लड़के में बहुत दम है,' सेहवागचं ट्वीट, पृथ्वीवर शुभेच्छांचा 'शॉ'वर  

विंडीज गोलंदाजांची ‘पृथ्वी’ प्रदक्षिणा, खणखणीत शतकासमोर लोंटागण!   

विंडीजविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर   

परदेश दौऱ्यात खेळाडूंना पत्नीसोबत राहू द्या : विराट