लंडन : सहा चेंडूत सहा बळी घेण्याचा अनोखा विक्रम इंग्लंडमधील 13 वर्षीय ल्यूक रॉबिन्सननं केला आहे. इतकंच नव्हे तर त्यानं सहाही फलंदाजांना त्यानं क्लीन बोल्ड केलं. हा देखील एक आगळावेगळा विक्रम आहे.


ल्यूकनं फिलाडेलफिया क्रिकेट क्लबकडून खेळताना हा विश्वविक्रम रचला. त्याच्या या कामगिरीवर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

ल्यूकनं जेव्हा हा अनोखा विक्रम रचला त्यावेळी त्याचं संपूर्ण कुटुंब या सामन्याला हजर होतं. ल्यूक ही 'ड्रीम ओव्हर' टाकण्यासाठी आला तेव्हा त्याचे वडील स्टीफन रॉबिन्सन हे पंच म्हणून समोर उभे होते. तर त्याचा भाऊ मॅथ्यू देखील मैदानातच क्षेत्ररक्षण करत होता. तर ल्यूकची आई हेलेन ही या सामन्यात स्कोररची भूमिका बजावत होती. तर ल्यूकचे आजोबा ग्लेन हे प्रेक्षकात बसून त्याचा सामना पाहत होते.

ल्यूकच्या या अनोख्या विक्रमानंतर बोलताना त्याच्या वडिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 'मी मागील 30 वर्षापासून क्रिकेट खेळत आहे. मी देखील एकदा हॅटट्रीक घेतली आहे. पण ल्यूकनं केलेला विक्रम आजवर तरी माझ्या ऐकीवात नाही. क्रिकेटमध्ये काहीही शक्य आहे. हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.'