कॅण्डी : श्रीलंकेविरूद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतानं पहिल्या दिवसअखेर 6 बाद 329 धावा केल्या. कॅंडीच्या पल्लिकेली स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात दमदार सुरुवात केल्यानंतर श्रीलंकेच्या फिरकीसमोर टीम इंडियाची घसरगुंडी उडाली.


नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताच्या शिखर धवन आणि लोकेश राहुल या दोन्ही सलामीवीरांनी भारताच्या डावाची दमदार सुरुवात केली. शिखर धवननं कारकीर्दीतील सहावं कसोटी शतक झळकावलं. त्यानं 123 चेंडूत 17 चौकारांसह 119 धावांची खेळी उभारली.

लोकेश राहुलनंही 135 चेंडूत 8 चौकारांसह 85 धावा केल्या. राहुलचं हे सलग सातवं अर्धशतक होतं. या दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी 188 धावांची भागीदारीही साकारली.

धवन आणि राहुल बाद झाल्यानंतर श्रीलंकेच्या फिरकीसमोर भारताचा डाव गडगडला. चेतेश्वर पुजारा 8 धावा काढून बाद झाला. त्यानंतर आलेल्या अजिंक्य रहाणेनं 13 तर आर अश्विननं 31 धावांचं योगदान दिलं. कर्णधार विराट कोहलीनंही 42 धावा करत संघाचा डाव सावरण्याचा थोडाफार प्रयत्न केला.

पहिल्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी रिद्धीमान साहा 13 तर हार्दिक पंड्या 1 धावांवर खेळत होता. श्रीलंकेतर्फे डावखुऱ्या मलिंदा पुष्पकुमारानं 3 तर लक्षण संदाकननं 2 विकेट्स घेतल्या.

श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कॅण्डी कसोटीत सलामीवीर शिखर धवनपाठोपाठ चेतेश्वर पुजाराही माघारी परतला. त्यामुळे भारताची अवस्था 3 बाद 229 अशी झाली होती. पुजारा अवघ्या 8 धावा करुन तंबूत परतला.

त्यापूर्वी शतकवीर शिखर धवनला पुष्पकुमारने माघारी धाडलं. धवन खणखणीत शतक झळकावून माघारी परतला. धवनने 107 चेंडूत शतक ठोकलं. त्याचं हे कसोटी कारकिर्दीतील सहावं शतक ठरलं.

मात्र त्यानंतर काहीसा आक्रमक झालेल्या धवनला पुष्पकुमारनेच चंदीमलकरवी झेलबाद केलं. धवनने 123 चेंडूत 17 चौकारांसह 119 धावा केल्या. धवन बाद झाला त्यावेळी भारताची धावसंख्या 2 बाद 219  अशी झाली.

दुसरीकडे शतकाच्या दिशेने कूच करणारा के एल राहुल मात्र शतकापासून वंचित राहिला. राहुल एक मोठा फटका खेळण्याच्या नादात वैयक्तिक 85 धावांवर झेलबाद झाला. धवन-राहुलने तब्बल 188 धावांची भागीदारी करुन दमदार सलामी दिली.

दरम्यान श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून टीम इंडियाने पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर के एल राहुल आणि शिखर धवन यांनी आश्वासक सुरुवात केली.

सलामीवीरांनी अर्धशतकं झळकावत, टीम इंडियाची धावसंख्या झटपट शंभरी पार केली. के. एल. राहुल आणि शिखर धवन यांनी आश्वासक सुरुवातीनंतर, वैयक्तिक अर्धशतकं पूर्ण केली.

राहुलने 67 चेंडूत तर धवनने  अवघ्या 45 चेंडूत अर्धशतक झळकावलं. राहुलचं हे सलग सातवं अर्धशतक ठरलं.

दरम्यान, अखिलाडूवृत्तीमुळे निलंबन झालेल्या फिरकीपटू रवींद्र जाडेजाच्या जागी, चायनामन गोलंदाज कुलदीप यादवचा या कसोटीत समावेश करण्यात आला आहे.

तत्पूर्वी, भारताने या कसोटी मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. पण तिसरी कसोटी जिंकून श्रीलंका दौऱ्यात नवा इतिहास घडवण्याची संधी विराट कोहलीच्या टीम इंडियाला आहे. भारताने श्रीलंका दौऱ्यातली तीन कसोटी सामन्यांची मालिका 3-0 अशी जिंकली, तर कसोटी क्रिकेटच्या इतिहासात टीम इंडियाचा हा परदेश दौऱ्यातला पहिला क्लीन स्वीप ठरेल.

भारताने कसोटी क्रिकेटच्या 85 वर्षांच्या इतिहासात आजवर कधीही परदेशात निर्विवादरित्या मालिका जिंकलेली नाही. त्यामुळे टीम इंडियाचा श्रीलंकेतला 3-0 असा विजय विराट कोहलीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारा ठरेल.