मुंबई: एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात काहीच क्षण असे येतात की ज्यानं त्याचं संपूर्ण जीवनच पालटतं. असेच काही क्षण टीम इंडियाचा माजी फलंदाज मोहम्मद कैफच्याही आयुष्यात बरोबर 15 वर्षापूर्वी आजच्या दिवशी म्हणजेच 13 जुलै 2002 मध्ये आले होते.

त्याच्या या एकाच खेळीनं त्यानं क्रिकेट रसिकांच्या मनावर अक्षरश अधिराज्य गाजवलं. कैफ, नेटवेस्ट मालिकेत अंतिम सामना आणि गांगुलीनं लॉर्डसच्या गॅलरीत गरागरा फिरवलेला टी-शर्ट. हे आजही तितकंच स्पष्टपणे चाहत्यांच्या लक्षात आहे.

13 जुलै 2002 रोजी लॉर्डसवर खेळवण्यात आलेल्या नेटवेस्ट मालिकेतील अंतिम सामन्यात भारताला इंग्लंडवर विजय मिळवण्याची नामी संधी होती. पण त्यासाठी भारताला  तब्बल 326 धावांची गरज होती. सेहवाग आणि गांगुलीची स्फोटक सुरुवात यामुळे भारत हा सामना सहज खिशात टाकेल असं वाटत होतं. पण क्रिकेटमध्ये कोणत्या क्षणी काय होईल याचा अंदाज लावता येत नाही आणि हेच या सामन्यामध्ये घडलं. सेहवाग गांगुली बाद झाल्यानंतर भारताचे निम्मे फलंदाज 150 धावांमध्येच तंबूत परतले.



यावेळी कैफ आणि युवराज यांनी अतिशय संयमी खेळी करत डाव पुढे नेला. पुन्हा एकदा भारताच्या विजयाच्या आशा पल्लवित झाल्या. पण त्याचवेळी युवराज 69 धावांवर बाद झाला. तरीही कैफनं धीर न सोडता एक बाजू लावून धरली आणि तळाच्या फलंदाजांना सोबत घेऊन सामना अगदी शेवटच्या षटकापर्यंत नेला. अखेर एक 75 चेंडूत 87 धावांची ऐतिहासिक खेळी साकारुन कैफनं भारताला अवर्णनीय असा विजय मिळवून दिला.


या एकाच खेळीनं कैफ त्यावेळी अक्षरश: संपूर्ण भारतात हिरो ठरला होता. आज पंधरा वर्षानंतरही या सामन्याची जादू कायम आहे. म्हणूनच बीसीसीआयनं देखील आपल्या ट्विटर अकाउंटवरुन या आठवणीला उजाळा देत या सामन्यातील शेवटचे क्षण व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केले आहेत.