कोलंबो : टीम इंडियाचा यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीने कोलंबोच्या पाचव्या वन डेत यष्टिरक्षक या नात्याने आपल्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. त्याने श्रीलंकेच्या अकिला धनंजयला यष्टिचीत करून, वन डे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शंभर फलंदाजांना यष्टिचीत करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला.


याआधी हा विक्रम श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक कुमार संगकाराच्या नावावर होता. त्याने 404 सामन्यांमध्ये 99 फलंदाजांना यष्टिचीत केलं होतं. धोनीने 301व्या सामन्यात यष्टिचीतच्या बळींचं शतक आणि विश्वविक्रम साजरा केला.

वन डेत सर्वाधिक यष्टीचीत करणाऱ्यांच्या यादीत धोनी आणि संगकारानंतर तिसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेचा आर. एस. कालुविथरना (75), चौथ्या क्रमांकावर पाकिस्तानचा मोईन खान (73) आणि पाचव्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाच्या अडम गिलख्रिस्ट (55) आहे.

धोनीने कसोटीत 38, वन डेत 100 आणि टी-20 क्रिकेटमध्ये 23 फलंदाजांना यष्टिचीत केलं आहे.