Shardul Thakur: माहिम-केळवे गावचा ढाण्या वाघ जाणून घ्या शार्दुल ठाकूरबद्दल सर्वकाही!
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत सातव्या विकेटसाठी शतकी भागीदारी आणि वेस्ट इंडिजविरुद्ध 6 चेंडूत 17 धावा ठोकून, हरलेली मॅच पुन्हा खेचून आणलेला हा तोच माहिम-केळवे गावचा ढाण्या वाघ शार्दुल ठाकूर.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतो टीम इंडियाकडून (Team India) खेळताना परदेश दौरे आटोपून विमानाने मुंबईत येतो. त्यानंतर अंधेरी स्टेशनवर लोकलचं तिकीट काढून पालघरपर्यंत उभं राहून रेल्वेने प्रवास करतो.
कोणताही बडेजाव न करतान मेहनत आणि परफॉर्मन्सच्या जोरावर टीम इंडियाचा दरवाजा ज्याच्यासाठी खाडकन् उघडला. तुला मानलं रे ठाकूर हे शब्द ज्याच्यासाठी खुद्द क्रिकेटचा किंग अर्थात विराट कोहलीने (Virat Kohli) उच्चारले तो आपला पालघरचा पठ्ठ्या शार्दुल ठाकूर! (Shardul Thakur)
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत सातव्या विकेटसाठी शतकी भागीदारी आणि वेस्ट इंडिजविरुद्ध 6 चेंडूत 17 धावा ठोकून, हरलेली मॅच पुन्हा खेचून आणलेला हा तोच माहिम-केळवे गावचा ढाण्या वाघ शार्दूल ठाकूर.
टीम इंडियामध्ये बॅटिंग आणि बोलिंग अशी दुहेरी कामगिरी कोण कोण बजावू शकेल, असा प्रश्न निवड समितीसमोर होता, त्यावेळी हार्दिक पांड्याचं नाव होतंच, पण त्याच्या जोडीला दुसरं नाव होतं आपल्या शार्दुल ठाकूरचं.
गोलंदाजीवेळी ठराविक अंतराने विकेट काढणार म्हणजे काढणारच, फलंदाजीवेळी टीमला आवश्यक असणाऱ्या धावा करणार म्हणजे करणारच, असा विश्वास ज्याच्यावर आहे तो शार्दूल ठाकूर. म्हणूनच तो टीम इंडियात लॉर्ड शार्दूल ठाकूर म्हणून ओळखला जातो.
भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू असणाऱ्या शार्दुल ठाकूरने यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये तीन सामने खेळले आहेत.शार्दुल आधी अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात प्लेइंग 11 मध्ये होता. या सामन्यांमध्ये त्याने दोन विकेट मिळवल्या. शाळेत असताना सहा चेंडूत सहा षटकार ठोकणारा शार्दुलला 'पालघर एक्सप्रेस' म्हणूनही ओळखलं जातं. उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करुन तो भल्याभल्यांची दांडी गुल करतो. शार्दुल शेवटच्या फळीमध्ये फलंदाजी करतो.
शार्दुल ठाकूरचा (Shardul Thakur Profile) जन्म 16 ऑक्टोबर 1991 रोजी पालघरमध्ये झाला आहे. त्याच्या वडिलांचे नाव नरेंद्र ठाकूर. ते नारळविक्रीचा व्यवसाय करतात. तर शार्दुलच्या आईचे नाव हंसा ठाकूर असून त्या गृहिणी आहेत.
शार्दुलला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती. शाळेत असताना तो आंतरशालेय क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेत असे. त्यावेळी क्रिकेटच्या एका सामन्यात त्याने सहा चेंडूत सहा षटकार लगावले होते. पालघरमधील आनंद आश्रम कॉन्वेंट इंग्लिश हायस्कूलमध्ये शार्दुलचं शालेय शिक्षण गेलं आहे. त्यानंतर मुंबई विद्यापाठातून त्याने पदव्युत्तर शिक्षण घेतलं.
शार्दुलला लहानपणापासूनच क्रिकेटची गोडी निर्माण झाली होती. मुंबईपासून 100 किलोमीटर दूर असलेल्या पालघरमध्ये त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. शार्दुल सुरुवातीला क्रिकेटचं प्रशिक्षण घेण्यासाठी दररोज पालघरवरून सात तासांचा प्रवास करुन मुंबईत येत असे.
करिअरच्या सुरुवातीला शार्दुलचं वजन 83 किलो होतं. त्यावेळी क्रिकेटपटू झहीर खानने त्याला वजन कमी करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर मेहनत घेत शार्दुलने 13 किलो वजन कमी केलं. शार्दुलने मुंबईच्या रणजी संघातून खेळायला सुरुवात केली.
शार्दुल ठाकूरने 2012-13 मध्ये रणजी स्पर्धेच्या माध्यमातून मुंबईतून खेळत खऱ्या अर्थाने क्रिकेट करिअरची सुरुवात केली. 2013-14 च्या रणजी स्पर्धेतही त्याने उल्लेखनीय कामगिरी केली. एका रणजी सामन्यात पाच गडी बाद करण्याचा विक्रम त्याने केला. त्यानंतर त्याला आणखी काही स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी मिळाली.
2015-16 च्या रणजी ट्रॉफी सामन्यात त्याने सौराष्ट्र संघाच्या आठ फलंदाजांना बाद करत मुंबईला जेतेपद मिळवून दिले. त्याच्या या कामगिरीची दखल घेत त्याला ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकाविरुद्ध भारतातर्फे खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर 2015-16 मध्ये रणजी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याने आठ विकेट्स घेत मुंबईला विजेतेपद मिळवून दिले.
शार्दुल ठाकूरने देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. त्याच्या या कामगिरीची दखल घेत 2015 च्या आयपीएलमध्ये (IPL) त्याच्यावर किंग्ज इलेव्हन पंजाबने बोली लावली. त्यामुळे तो 2016 आणि 2016 ही दोन वर्ष पंजाबकडून खेळला. पुढे ऑल-राऊंडर म्हणून तो ओळखला जाऊ लागला. पुणे सुपरजायंट्स आणि चेन्नई संघातून खेळण्याचीही त्याला संधी मिळाली. शार्दुल ठाकूर 2023 पासून कोलकाता नाईट रायडर्स संघाचाही भाग आहे.
शार्दुल ठाकूरने 21 फेब्रुवारी 2018 रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मध्ये पदार्पण केलं. तसेच वेस्ट इंडिज विरुद्धचा पहिला कसोटी सामनाही तो खेळला. आतापर्यंत एकूण आंतरराष्ट्रीय कारकीर्दीमध्ये त्याने आठ सामन्यांमध्ये 254 धावा केल्या आहेत. 35 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 298 धावा केल्या आहेत. 'आशिया कप 2023' च्या भारतीय संघामध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे.
शार्दुल ठाकूरचे रेकॉर्ड्स (Shardul Thakur Records) - हॅरिस शिल्ड ट्रॉफी 2006 मध्ये आपल्या शाळेसाठी खेळताना शार्दुल ठाकूरने सहा चेंडूत सहा षटकार मारले आहेत. हा रेकॉर्ड करणारा तो तिसरा क्रिकेटर आहे. - 2012-13 च्या रणजी स्पर्धेत शार्दुलने सहा सामन्यात 26.25 च्या सरासरीने 27 विकेट्स घेतल्या. - शार्दुलने 2013-14 च्या रणजी स्पर्धेत 10 सामन्यात48 विकेट्स घेतल्या आहेत. - 2015-16 च्या रणजी स्पर्धेत सौराष्ट्र क्रिकेट संघाविरुद्ध 8 विकेट्स घेतले आणि मुंबईला 41 व्या रणजी ट्रॉफी विजेतेपदावर नेले.
शार्दुल ठाकूर 27 फेब्रुवारी 2023 रोजी गर्लफ्रेंड मिताली पारुलकरसोबत लग्नबंधनात अडकला आहे. लग्नानंतर अनेक वर्षे ते एकमेकांना डेट करत होते. 2021 मध्ये त्यांचा साखरपुडा पार पडला. शार्दुलची पत्नी मिताली पारुलकर उद्योगपती आहे. 'All The Jazz-Luxury Bakes' नावाच्या कंपनीची ती संस्थापिका आहे.
शार्दुल ठाकूरची एकूण संपत्ती 40 कोटींच्या आसपास आहे. बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट अंतर्गत ग्रेड-बी श्रेणीतील खेळाडूंमध्ये शार्दुलचा समावेश होतो. त्यामुळे त्याचे वर्षाला त्याला तीन कोटी रुपये मिळतात. एका कसोटी सामन्यासाठी 15 लाख रुपये, वनडेसाठी सहा लाख रुपये आणि टी-20 साठी तीन लाख रुपये त्याला मिळतात.
आयपीएल 2023 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने शार्दुलला 10.75 कोटी रुपये देऊन आपल्या संघात सामिल केले. अनेक जाहिरातींच्या माध्यमातून तो चांगलीच कमाई करतो. शार्दुलच्या कार कलेक्शनमध्ये अनेक महागड्या गाड्यांचा समावेश आहे.