आता गोलंदाजांनाही 'टाईमआउट'; ICCचा नवा नियम, नाहीतर प्रतिस्पर्धी संघाला 5 धावांचा बोनस
ICC New Rule: वर्ल्डकप 2023 संपूर्ण स्पर्धा तशी अत्यंत रोमांचक होती. यंदा वर्ल्डकपचं यजमानपद भारताकडे होतं. टीम इंडियानं वर्ल्डकप गमावला, पण कोट्यवधी चाहत्यांची मनं जिंकली. यंदाच्या वर्ल्ककपमध्ये अनेक किस्से गाजले, त्यापैकीच एक म्हणजे, श्रीलंकेच्या अँजेलो मॅथ्यूजचा (Angelo Mathews) टाईमआउट.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appश्रीलंकेचा फलंदाज अँजेलो मॅथ्यूज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टाईमआउट होणारा जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला. आता आयसीसीनं गोलंदाजांसाठीही टाईमआउटसारखा नवा नियम आणला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटनं नवा नियम आणला असून त्यामुळे गोलंदाजी करणाऱ्या संघाला नक्कीच अडचणी निर्माण होणार आहेत. हा नवा नियम टाईमआउटशी संबंधित आहे. फलंदाजांसाठी जसा टाईमआउट नियम लागू होतो, तसाच हा नवा नियम गोलंदाजांसाठी असणार आहे.
नव्या नियमानुसार, आता गोलंदाजी करणाऱ्या संघाला याची काळजी घ्यावी लागेल की, एक ओव्हर संपल्यानंतर पुढचा गोलंदाज 60 सेकंदात म्हणजेच, एका मिनिटांत पुढील ओव्हर टाकण्यास तयार असला पाहिजे. जर असं झालं नाही, तर मात्र संघाला पॅनल्टी दिली जाईल.
डिसेंबर 2023 ते एप्रिल 2024 दरम्यान पुरुषांच्या ODI आणि T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ICC द्वारे चाचणी म्हणून हा नवा नियम लागू केला जाईल. नियमांनुसार, दोन षटकांमधील वेळ मोजण्यासाठी घड्याळाचा वापर केला जाईल.
60 सेकंदात म्हणजेच, एक मिनिटाच्या आत एक ओव्हर केल्यानंतर गोलंदाजी करणारा संघ पुढच्या षटकासाठी तयार नसेल तर क्षेत्ररक्षणावर दंड आकारला जाईल. दरम्यान, जर गोलंदाजी करणारा संघ एका डावात एका मिनिटांत तीन वेळा दुसरी ओव्हर टाकू शकला नाही, तर त्यांना 5 धावांचा दंड लागू होईल. म्हणजेच, प्रतिस्पर्धी संघाला (फलंदाजी करणारा संघ) पाच धावा दिल्या जातील.
श्रीलंकेचा अँजेलो मॅथ्यूज हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टाईमआऊट झालेला पहिला फलंदाज ठरला. बांगलादेशविरुद्धच्या विश्वचषक सामन्यात तो एकही चेंडू न खेळता बाद झाला.
आयसीसीच्या नियमानुसार, नव्या फलंदाजानं दोन मिनिटांच्या निर्धारित वेळेत फलंदाजीसाठी सज्ज होणं अपेक्षित आहे. पण फलंदाजीचा पवित्रा घेण्याआधी मॅथ्यूजला आपल्या हेल्मेटचा पट्टा तुटल्याचं लक्षात आलं. त्यामुळं त्यानं राखीव खेळाडूकडून दुसरं हेल्मेट मागवलं. त्यात काही वेळ गेल्यानं बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन आणि इतर क्षेत्ररक्षकांनी मॅथ्यूजविरोधात टाईमआऊटचं अपील केलं.
मैदानावरच्या पंचांनी तो निर्णय तिसरे पंच नितीन मेनन यांच्यावर सोपवला. त्यांनी डीआरएसचा वापर करून मॅथ्यूजविरोधातलं टाईमआऊटचं अपील उचलून धरलं. त्यानंतर अँजेलो मॅथ्यूजनं मैदानावरील पंचांशी काही काळ वाद घातला. पण बांगलादेशचा कर्णधार आपल्या अपिलावर ठाम राहिला. त्यामुळं तिसऱ्या पंचांचा निर्णय स्वीकारून अँजेलो मॅथ्यूजला पॅव्हेलियनमध्ये परतावं लागलं.